समीर देशपांडेकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. कोल्हापूर मतदारसंघातून शाहू छत्रपती आणि हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने निवडून आले आहेत. धैर्यशील माने हे सत्तारूढ पक्षाचे खासदार आहेत. ते दुसऱ्यांना निवडून आले आहेत. तर शाहू छत्रपती हे गेली अनेक वर्षे सामाजिक, क्रीडा क्षेत्रात सक्रिय असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी या दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.गेल्या काही वर्षांत कोल्हापूर विमानतळ अतिशय देखणे बनले. नवनवीन विमानसेवाही सुरू झाल्या. आता जगाच्या नकाशावर कोल्हापूरचे विमानतळ आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण सुरू आहे. केंद्र शासनाच्या निधीतून जलजीवन मिशनच्या पाणी योजना सुरू आहेत. केंद्र शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे सुरू आहेत. परंतु अजूनही कोल्हापूरच्या चौफेर विकासासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. त्याचा पाठपुरावा या दोन्ही खासदारांकडून अपेक्षित आहे.
शाहू छत्रपती यांच्याकडून या आहेत अपेक्षाकोल्हापूरची हद्दवाढ : जोपर्यंत शहराची हद्दवाढ होत नाही, तोपर्यंत कोल्हापूर शहर हे केंद्र शासनाच्या निधी वाटपाच्या निकषात बसत नाही. त्यामुळे शेजारच्या गावांचा कोल्हापूरमध्ये समावेश करण्यासाठी खासदार आणि ज्येष्ठ नेते या नात्याने त्यांनी किमान सहमती घडवावी आणि शहर हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढावा.सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन : कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या पाहता आणि जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी केंद्र शासनाकडून विशेष निधी आणावा, जेणेकरून पंचगंगेचे प्रदूषणही नियंत्रित राहील.विमान, रेल्वे सुविधा वाढाव्यात : सध्या कोल्हापुरातून विमानसेवा वाढली आहे. ती जागतिक नकाशावर नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत. देशांतर्गत विमानसेवा वाढावी, तसेच कोल्हापूर-मुंबई वंदे भारत रेल्वेसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. सध्या सुरू असलेले रेल्वे स्टेशनच्या कामाला हेरिटेज लूक देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात आणि कोल्हापूर पुणे इंटरसिंटी सेवा सुरू करावी.मोठा औद्योगिक प्रकल्प : शहराशेजारील एमआयडीसींमध्ये नवे उद्योग येण्याचे प्रमाण कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी मोठा औद्योगिक प्रकल्प किंवा वेगवेगळ्या ठिकाणी छोटे औद्योगिक प्रकल्प आणावेत.पर्यटनवाढीसाठी नावीन्यपूर्ण योजना : जिल्ह्यात अंबाबाई, ज्योतिबासारखी देवस्थाने आहेत. ऐतिहासिक किल्ले आहेत. समुद्र आणि वाळवंट सोडून सर्व काही जिल्ह्यांत आहे. परंतु पर्यटक कोल्हापुरात थांबत नाही. चित्रपटसृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरमध्ये या क्षेत्राशी संबंधित एखादे संग्रहालय उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
कोणत्याही शहराच्या प्रगतीमध्ये रेल्वेसेवा महत्त्वाची ठरते. त्यामुळे छत्रपती शाहू यांच्या माध्यमातून कोल्हापुरातून देशभर रेल्वे जाण्यासाठी प्रयत्न व्हावेत. सर्वसामान्यांचा आधार असणारी हे सेवा वाढतानाच कोल्हापूर वैभववाडीच्या प्रस्तावालाही गती मिळावी. -शिवनाथ बियाणी, पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य
कोणत्याही पक्षाने लोकसभेच्या जाहीरनाम्यात पर्यावरणाचा उल्लेख केला नाही. प्लास्टिकच्या उत्पादनावर बंदी न घालता प्लास्टिकबंदीची घोषणा केली जाते. सह्याद्री घाट उद्ध्वस्त करणाऱ्या धोरणांना तरी विरोध व्हावा आणि केंद्र शासनाने संवेदनशील ठरवलेली गावांबाबत अंमलबजावणीसाठी राज्य सरकारवर दबाव आणावा, अशी अपेक्षा आहे. -डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पतीतज्ज्ञ
राजर्षी शाहू महाराज आणि राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या चौफेर विकासासाठी काम केले. हेच काम विस्तारित स्वरूपात शाहू छत्रपतींनी करावे. तसेच गड-किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी मोहीम हाती घ्यावी, अशी अपेक्षा आहे. -इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाबाबत मी समाजातील विविध घटकांशी चर्चा सुरू केली आहे. या चर्चेतून जे मुद्दे पुढे येतील त्यातून कोल्हापूरच्या प्रश्नांबाबतचा प्राधान्यक्रम ठरविला जाईल आणि निश्चित त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि नवे काहीतरी उभे करण्यासाठी मी बांधिल आहे. -शाहू छत्रपती खासदार
धैर्यशील माने यांच्याकडून या आहेत अपेक्षा..इचलकरंजीला सुळकूडजवळून पाणी : इचलकरंजीला सुळकूडजवळून पाणी देण्याची योजना कागल आणि हातकणंगले तालुक्यांत संघर्षाचा मुद्दा बनला आहे; परंतु ही योजनाच राबवण्याचा शब्द खासदार माने यांनी दिला होता. तो त्यांना पूर्ण करून इचलकरंजीकरांना शुद्ध पाणी देण्याची कामगिरी करावी लागणार आहे. या मुद्यावर कागलच्या लोकांच्याही भावना तीव्र आहेत.वस्त्रोद्योगाला उभारी : इचलकरंजी ही वस्त्रोद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. या उद्योगाला वीज सवलत असो किंवा यासारख्या अनेक प्रश्नांनी हा उद्योग सध्या बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडवतानाच या क्षेत्राशी संबंधित माेठा उद्योग इचलकरंजीजवळ आणण्यासाठी खासदार म्हणून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा आहे.पंचगंगा प्रदूषण : गेली ४० वर्षे पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा नेहमी मासे मरायला सुरुवात झाली की चर्चेत येतो. माने यांनीच या प्रश्नी केंदाळात उतरून आंदोलन केले होते. आता केंदाळात न उतरता त्यांना या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ठोस काही तरी करून दाखवण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून त्यांना हा प्रश्न कायम निकाली लावावा लागणार आहे. यासाठी पायाला भिंगरी बांधली आणि कोल्हापूर, मुंबई, दिल्ली, अशा फेऱ्या मारल्या तरच हे शक्य होणार आहे. क्षारपड जमिनीचाही मुद्दा हाती घ्यावा लागणार आहे.पर्यटन विकास: एकीकडे बाहुबली, नृसिंहवाडी, खिद्रापूर यासारखी धर्मस्थळे आणि दुसरीकडे पन्हाळा, विशाळगडासारखे ऐतिहासिक किल्ले, शाहूवाडीचे घनदाट जंगल, या साऱ्यांचा पर्यटनवाढीसाठी आणि पर्यायाने स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर लाभ कसा होईल, याकडे लक्ष देण्याची गरजकृषी, उद्योगाला प्राधान्य: हातकणंगले हा मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे शाहूवाडीसारख्या दुर्गम भागात एमआयडीसी सुरू करून तेथे स्थानिक आणि बाहेरील उद्योजकांनी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. शिराळा, वाळवा, शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील कृषी उत्पन्नावरही आधारित काही उद्योग सुरू करून शेतमालाचा उठाव आणि बेरोजगारांना रोजगार यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
वस्त्रोद्योग, शेती, महापूर व्यवस्थापन, क्षारपड जमीन, पाण्याच्या प्रश्नावरून निर्माण होणारे तणाव, पंचगंगेचे प्रामाणिक शुद्धीकरण, इचलकरंजी शहरांतर्गत वाहतूक, पर्यटनदृष्ट्या नियोजन, शहर व शहरालगतचे रस्ते, औद्योगिक गुंतवणूक, उर्वरित रेल्वे प्रश्न याकडेही लक्ष दिले पाहिजे. -प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस, समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी
इचलकरंजीला रेल्वे नेण्यापासून, पंचगंगा प्रदूषणापर्यंत या मतदारसंघातील अनेक प्रश्न आव्हानात्मक आहेत. त्याच्या सोडवणुकीसाठी खासदारांनी प्रयत्न करावेत, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यासाठीही त्यांनी पुढाकार घ्यावा. -राजू मगदूम, सरपंच, माणगाव
इचलकरंजी पाणी प्रश्न, वस्त्रोद्योग, पंचगंगा प्रदूषण, मंजुरच्या अंतिम टप्प्यात असलेल्या औद्योगिक वसाहती याबाबत आता पाठपुरावा करणार आहे. माझ्या मतदारसंघातून अनेक राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शेतकरी, नागरिक यांचे प्रश्न सोडवून या महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा करण्यात येईल. - धैर्यशील माने खासदार, हातकणंगले