अणुस्कुरा :-
अणुस्कुरा केंद्रशाळेत आदर्श व्यक्ती "ग्रेट भेट" उपक्रम:-
शालेय जीवनातच मुलांना यशस्वी व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घडवून आणून त्याच्याशी सवांद साधला तर मुलांच्यातील न्यूनगंड नाहीसा होऊन आत्मविश्वास वाढतो. यासाठी अणुस्कुरा ( ता. शाहूवाडी) येथील प्राथमिक शाळेत आदर्श व्यक्ती ग्रेट भेट उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रशासकीय, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कला इ. क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीची भेट शाळेत आयोजित केली जाते. मुले त्या क्षेत्रावर प्रश्नावली तयार करतात, त्यातील विशिष्ट महत्त्वाच्या प्रश्नांची निवड मुलाखतीसाठी केली जाते. आतापर्यंत शाळेत शाहुवाडीचे पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, मलकापूर ग्रामीण आरोग्य केंद्राचे डॉ. एस. एस. कुलकर्णी व डॉ. पी. बी. चौगले, तबलावादक रामदास निकम यांची शाळेत भेट घडवून मुलाखत आयोजित केली होती. या मुलाखतीमधून व्यक्ती प्रत्यक्ष समोर असल्याने त्या क्षेत्राची अगदी सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळते.
कोणत्याही क्षेत्रात करियर करावयाचे असल्यास शालेय जीवनापासूनच अभ्यास कसा करावा?, कोणते खेळ खेळावेत, पुस्तके कोणती वाचावीत इ. महत्त्वपूर्ण बाबी मुलांना समजतात.
आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडल्यास यश निश्चित मिळते, हे प्रत्यक्ष यशस्वी व्यक्तीच्या तोंडून ऐकल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो.
शालेय वयात ‘मुलाखत कौशल्याचा’ अभ्यास होण्यास मदत होते. हा उपक्रम यशस्वी करण्यास गट शिक्षणाधिकारी उदय सरनाईक, केंद्रप्रमुख कैलास वसावे, मुख्याध्यापक दशरथ आयरे, शिक्षक प्रकाश गाताडे, सलीम कागवडे,अमोल काळे यांनी परिश्रम घेतले.
चौकट:-अणुस्कुरा शाळेतील शिक्षक राबवित असलेला हा उपक्रम खूपच आदर्शवत आहे, या उपक्रमात मुलांचा विविध क्षेत्रांत यशस्वी व्यक्तीशी संवाद होत असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते व मुलांचे अनौपचारिकपणे शिक्षण घडते.
उदय सरनाईक
गट शिक्षणाधिकारी शाहूवाडी
फोटो:- अणुस्कुरा प्राथमिक शाळेत ‘ग्रेट भेट’ उपक्रमांतर्गत शाहुवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांचे स्वागत करताना शाळेतील मुली.