कोल्हापूर : कोरोना संसर्ग, लॉकडाऊन, सोशल डिस्टन्स या सर्वांना मागे सारत बुधवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जिल्ह्यात धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरी झाली. शोभायात्रा, मिरवणूका, जाहीर व्याख्यानांना फाटा दिला असलातरी पुतळ्याला पुष्पमालांनी अभिवादन करण्यासाठी रीघ लागल्याचे सार्वत्रिक चित्र होते. गुढ्या उभारुन, पुष्पांची उधळण करत जल्लोष साजरा केला गेला.बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत साकारलेल्या अर्धपुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची रीघ लागली होती. तेथील मध्यप्रदेशातील महू या गावातील आंबेडकरांचे जन्मस्थळ असलेल्या घराची प्रतिकृतीही लक्ष वेधून घेत होती. पुतळ्याच्या भोवती आकर्षक सजावटही करण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायांनी या घरासह पुतळ्यासमोर नतमस्तक होत महामानव बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार केला.
पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतूराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार सुजीत मिणचेकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, अशोक जाधव, प्रा. शरद गायकवाड, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, उत्तम कांबळे, सदानंद डीगे, डी.जी.भास्कर, विश्वास देशमुख, रुपाली वायदंडे, संजय जिरगे, सुभाष देसाई यांनी अभिवादन केले. विविध आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बिंदू चौकात गर्दी केली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती सार्वजनिक रित्या साजरी करु नये, साधेपणानेच घरात राहूनच करावी असे निर्देश शासकीय पातळीवर देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात जयंतीच्या उत्साहासमोर सर्व नियम फिके पडले. गावागावात, गल्लोगल्ली, चौकाचौकात फोटोपुजनासह अभिवादनाचे कार्यक्रम जल्लोषात करण्यात आले.पिपल्स रिपब्लीकन पार्टी: जिल्हाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय सदस्य डी.जी.भास्कर यांच्या हस्ते बिंदू चौकातील पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. करवीर तालुकाध्यक्ष रमेश पाचगावकर, विलास भास्कर, जगन्नाथ कांबळे, प्रकाश संघमित्र, प्रकाश सातपुते, बाजीराव गायकवाड, तकदीर कांबळे उपस्थित होते.जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघ: खादी ग्रामोद्योग संघ, सर्वोदय मंडळ, स्वातंत्र्यसैनिक वारस संघटना, समता हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. सुंदरराव देसाई यांनी फोटो पुजन केले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्राचार्य व्ही.डी.माने, दादासाहेब जगताप, सुजय देसाई, सदाशिव मनुगडे, एस.एस.सावंत, विष्णूपंत अंबपकर, पी.के.पटील, आर.डी.पाटील, सविता देसाई, छाया भोसले प्रमुख उपस्थित होते.बौध्द अवशेष विचार संवर्धन समिती:संस्थेचे अध्यक्ष टी.एस.कांबळे , कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे यांनी रात्री १२ वाजता सालाबादप्रमाणे बिंदू चौकातील पुतळ्याला अभिवादन केले.यावेळी सर्जेराव थोरात, विपुल वाडीकर, अजित कांबळे, अर्जून कांबळे, संजय माळी यांनी सहभाग घेतला. यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगणारे कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात आले.