कोल्हापूर : फंगल इन्फेक्शन्समुळे अंगाला खाज सुटत असल्याच्या रुग्णांत गेले महिनाभर प्रचंड वाढ झाली आहे. त्वचारोगतज्ज्ञांकडे याच रु ग्णांची गर्दी उसळत आहे. पावसामुळे ओलसरपणा राहत असल्यामुळे हा त्रास होतो. कोरडे कपडे घालणे हाच त्यावरील सर्वांत चांगला उपाय असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. डी. आर. नलवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॉ. नलवडे म्हणाले, ‘पाऊस, घाम किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शरीर ओलसर राहिले तर त्या ठिकाणी खाज सुटते. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत सातत्याने पाऊस पडत असल्याने या रुग्णांची संख्या वाढली आहे. काखेत, जांघेत, गळ्यावर किंवा पायाच्या बेचक्यातही ही खाज सुटते.
आपण हल्ली फॅशन म्हणून सिंथेटिक व अत्यंत घट्ट कपडे वापरतो. त्यामुळे हवा खेळती राहत नाही. त्यामुळेही हा त्रास बळावू शकतो. त्यासाठी यापुढे हंगामानुसार कपडे वापरणे व शरीर पुरते कोरडे राहील याची काळजी घेतली तरच हा त्रास कमी होऊ शकतो. अनेक रुग्णांना मेडिकलच्या दुकानांतून स्वत:च कसले तरी मलम आणून उपाय करण्याची सवय असते. ते धोकादायक असून त्यातून त्रास वाढू शकतो. त्यासाठी योग्य उपचार करून घेण्याची गरज आहे.’