कोल्हापूर : अपघातात ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे त्याच्या इच्छेनुसार हृदयासह चार अवयव दान करण्यात आले. शनिवारी कोल्हापुरात प्रथमच ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे कोल्हापूर, मुंबई, पुणे या जिल्ह्यांतील संबंधित रुग्णालयांकडे इतर रुग्णांवर प्रत्यारोपणासाठी अवघ्या चार तासांत सुपूर्द करण्यात आले. अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये या रुग्णाचे हे अवयव यशस्वीरीत्या काढण्यात आले. ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे हृदय प्रत्यारोपणासाठी यशस्वीरीत्या काढणारे कोल्हापूरचे ‘अॅस्टर आधार’ हे राज्यातील चौथे हॉस्पिटल ठरल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. अमर पांडुरंग पाटील (वय ३१, रा. निगवे खालसा, ता. करवीर) असे या अवयवदान केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या रुग्णाचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याची माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांना दिली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयवदान करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर शनिवारी सकाळपासून सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. मग संबंधित हॉस्पिटलला प्रत्यारोपणाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या रुग्णवाहिका दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अॅस्टर हॉस्पिटलच्या दारात उपस्थित झाल्या.
अॅस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर पथकाने धावपळ करून, सुमारे दोन तास रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याचे हृदय, दोन किडन्या व एक लिव्हर काढून (हार्वेस्ट) प्रत्यारोपणासाठी त्या-त्या जिल्ह्यांतील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
अमर पाटीलची पार्श्वभूमी...अमर पाटील हा स्प्रे पेंटिंग व्यावसायिक होता. तो ३० एप्रिल रोजी स्प्रे पेंटिंगचे साहित्य आणण्यासाठी कोल्हापूरला मित्रासोबत गेला होता. दुचाकीवरून येताना येवती फाटा (ता. करवीर) येथे एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा मुलगा प्रेम, सहा वर्षांची मुलगी अस्मिता, वडील पांडुरंग, दोन भाऊ मनीष व सचिन असा परिवार आहे.
माझे पती वेगवेगळ्या रूपाने जिवंत राहावेत ही माझी व कुटुंबीयांची इच्छा आहे. आपले अवयव गरजूंना मिळावेत, अशी त्यांनी इच्छा यापूर्वी बोलून दाखविली होती. त्यानुसार त्यांचे अवयव गरजूंपर्यंत पोहोचू देत, त्यांचे आशीर्वाद माझ्या मुलांना मिळूदेत, त्यातून त्यांचे नाव अमर राहील. पतीने आमच्यासाठी खूप काही केले. सोडून जातानाही ते चार व्यक्तींनाही आपले अवयव देऊन गेलेत. शासनानेही माझ्या कुटुंबीयांचा विचार करावा. माझ्यासारखी परिस्थिती आलेल्या इतर महिलांनीही माझ्यासारखा विचार करावा, ही विनंती.- शीतल अमर पाटील (पत्नी)
अमरच्या इच्छेप्रमाणे त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय आम्हा सर्व कुटुंबीयांनी चर्चेअंती घेतला आहे. तो इतरांमध्ये अवयवाच्या रूपाने अमर राहावा, हीच इच्छा आहे.- मनीष पांडुरंग पाटील (रुग्णाचा भाऊ)
प्रत्यारोपणासाठी येथे पाठविले अवयव
- - हृदय : फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई
- -एक किडनी : आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे
- - लिव्हर : ज्युपीटर हॉस्पिटल, बाणेर, पुणे
- - एक किडनी : अॅस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर