कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त आज, रविवारी मराठा महासंघातर्फे सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी चौकात पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मोजक्या शिवप्रेमींच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा गेली अनेक वर्षे मराठा महासंघ व कोल्हापुरातील शिवप्रेमी जनतेच्यावतीने लोकोत्सव म्हणून विविध उपक्रमाने साजरा केला जात होता. यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गामुळे व्याख्यानमाला, मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत कोरोना दक्षता घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी घरी राहूनच अभिवादन करावे. असे आवाहन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.