कोल्हापूर : सत्तारूढ आणि विरोधी अशी वाटणी न करता सर्वांना सोबत घेऊन कोल्हापूरजिल्हा परिषद देशात पहिली यावी, यासाठी काम करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुश्रीफ शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुश्रीफ, अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोल्हापूर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अभिवादनानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात बोलताना मुश्रीफ म्हणाले, यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिली आल्याबद्दल मी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक संरचनेचा पाया घातला. कोयना धरणाची उभारणी केली. म्हणून आज महाराष्ट्र प्रकाशात दिसतो आहे. यावेळी मुश्रीफ यांच्या हस्ते पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात न्यू पॅलेस विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांच्या झांजपथकाचे प्रात्यक्षिक झाले. विद्यामंदिर बाचणी आणि कणेरीवाडीच्या विद्यार्थ्यांनी दोरीवरील मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, प्रतिष्ठानचे अशोक पोवार, रमेश मोरे, माणिक मंडलिक, चंद्रकांत सूर्यवंशी, भरत रसाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.विद्युत रोषणाई आणि साखर पेढे वाटपजिल्हा परिषद राज्यात पहिली आल्याबद्दल नागाळा पार्क येथील इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सकाळी साखर-पेढ्यांचे वाटप केले. पंचायत राज व्यवस्थेचे प्रणेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनीच जिल्हा परिषद राज्यात पहिली आल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.