आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0८ : बाजार समितीचा प्रवेश शुल्क थकविल्याने धान्याची ने-आण करणाऱ्या वाहनांची वाहतूक समिती प्रशासनाने रोखली. वर्षभराचा सुमारे २१ लाख रुपये प्रवेश शुल्क थकविल्याने शुक्रवारपासून धान्याचे ट्रक आत सोडलेले नव्हते. अखेर सोमवारी शासकीय धान्य भांडारच्या प्रबंधकांशी झालेल्या चर्चेनंतर संबधित वाहतूक संस्थेने साडेचार लाख रुपये गुरुवारी देण्याच्या लेखी आश्वासनानंतर वाहतूक पूर्ववत सुरू केली.
बाजार समिती आवारात केंद्रीय धान्य गोदामे आहेत. रेल्वे गुडस् यार्डातून आलेला माल तेथे साठवून तेथून स्वस्त धान्य दुकानात पोहोचविण्याचे काम वाहतूक ठेकेदार करतात. कोल्हापूर सहकारी मजूर व हमाल संस्थेकडे हा ठेका असून त्यांचे ८३ ट्रक मालाची रोज येथून वाहतूक करतात. या कामासाठी सरकारकडून त्यांना भाडे दिले जाते.
समितीचे उत्पन्न वाढावे व वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून समिती प्रशासन गेल्या अनेक वर्र्षांपासून समितीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून प्रवेश शुल्क आकारते. शेतकऱ्यांसह येणाऱ्या सर्वच वाहनांवर वीस रुाये प्रवेश शुल्क, तर चोवीस तास ते वाहन समिती आवारात थांबले, तर ५० रुपये पार्किंग म्हणून घेतले जाते. धान्य वाहतूक करणाऱ्या संबधित संस्थेकडून वसूल केले जाते. जून २०१६ पासून मजूर व हमाल संस्थेने सहा लाख रुपयांचा धनादेश समिती प्रशासनाकडे दिला होता; पण इतर वाहनांप्रमाणे २१ लाख रुपये भरण्याबाबतचे पत्र १७ एप्रिल २०१७ ला संबंधितांना दिले होते. तरीही संस्थेने दखल न घेतल्याने शुक्रवारपासून ट्रक रोखले होते.
सोमवारी सकाळी धान्याची रेक आल्याने अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली. समितीचे सभापती सर्जेराव पाटील, संचालक परशुराम खुडे, उदय पाटील, बाबा लाड, उपसचिव मोहन सालपे यांच्याशी शासकीय धान्य भांडार प्रबंधक देवेंद्र सिंग व इतर अधिकारी सोमवारी चर्चेसाठी आले. थकीत रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम जमा करा, मगच वाहने सोडली जातील, असे सभापती पाटील यांनी लावून धरले. अखेर साडेचार लाख रुपये गुरुवारी देण्याचे लेखी आश्वासन भांडार प्रबंधकांनी दिल्यांनतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
मग गुन्हा दाखल कराच!
रेक थांबल्याने कोट्यवधींचा तोटा होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार समिती प्रशासनावर गुन्हा दाखल करू असे देवेंद्र सिंग यांनी सांगितले. यावर संतप्त झालेले मोहन सालपे यांनी आम्ही पणनच्या कायद्यानुसार वसुली करतोय, कायदा पाळतोय म्हणून गुन्हा दाखल करणार असाल तर कराच, अशी तराटणी दिल्यानंतर सिंग जमिनीवर आले.