लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील गुन्हेगारीचा आलेख वेगाने वाढतच आहे, त्याचा ताण साहजिकच आय.जी. (विशेष पोलीस महानिरीक्षक) कार्यालयावर पडत आहे. परिणामी कोल्हापूर आयुक्तालय मागणीला बळ मिळत आहे. आय.जी. कार्यालयाचा वाढता भौगोलिक विस्तार लक्षात घेता, समन्वयातील अडचणी असल्या तरी, त्या फक्त पोलीस महासंचालकांसमोरच जाहीर करणे प्रत्येक आय.जी.ना बंधनकारक असते. मुळात हे पदच प्रशासकीय असल्याने त्यांचा नागरी संपर्क हा पूर्णत: दूरच आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण अशा पाच जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाचा विस्तार आहे. परिक्षेत्रात पुणे ग्रामीणचा क्राईम रेट अव्वल आहे. त्यापाठोपाठ सोलापूर ग्रामीण व त्यानंतर इतर उवरित तीन जिल्ह्यांचा क्राईम रेट आहे. त्यामुळे कोल्हापूर आयुक्तालय मागणीला बळ येत आहे.
नागरिकांना अन्यायाबाबत पोलीस स्टेशनपासून जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत दाद मागण्याचा अधिकार असतो. त्यांच्याकडून प्रश्न निर्गत न झाल्यास तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मांडला जातो. नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरीही त्या पोलीस स्टेशनमार्फत सोडविल्या जाऊ शकतात. क्वचितच प्रश्न हे आयजी कार्यालयापर्यंत पोहोचतात.
सांगली जिल्ह्यात २६ पोलीस स्टेशन्स असून गेल्यावर्षी सुमारे ३२ टोळ्या मोक्कांतर्गत कारवाईत गजाआड असल्याने पूर्वीचा टोळ्यांचा वर्चस्ववाद थांबला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ३० पोलीस ठाणी असून २२ टोळ्या मोक्कांतर्गत गजाआड आहेत. सातारा जिल्ह्यातही २९ पोलीस स्टेशन्स असून ४३ गुंड मोक्कांतर्गत गजाआड आहेत. तिन्हीही जिल्ह्यात गतवर्षी गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक हे पदच मुळाच प्रशासकीय आहे. त्याचा व्याप मोठा असला तरीही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कामकाज पध्दतीवर सुपरव्हीजन ठेवण्याची जबाबदारी या पदाची असते. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आठवडा डायऱ्या तपासणे, त्यांनी केलेल्या कामांचे मूल्यमापन करणे, त्यांनी केलेली तपासणी नियमानुसार, योग्य वेळेत होते का?, तपासणीचा दर्जा कसा आहे? पोलीस अधीक्षकांचे प्रशासकीय नियंत्रण कसे आहे? विभागीय चौकशी, शिक्षा, आरोपी वेळेवर अटक होतात का? यावर पोलीस महानिरीक्षकांचा वॉच असतो. त्यामुळे पोलीस महानिरीक्षकांचे काम हे प्रशासकीय पातळीवर आहे, तर पोलीस अधीक्षकांचे काम हे नागरी पातळीवर आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रात जिल्हा - पोलीस स्टेशन संख्या - वर्षात एकूण गुन्हे
- पुणे ग्रामीण - ३३ - ९५००
- सोलापूर ग्रामीण - २८ - ७५०५
- सांगली - २६ - ५२२०
- सातारा - २९- ५०३५
- कोल्हापूर - ३० - ५४००