कोल्हापूर : राज्यातील अति शोषित, शोषित पाणलोट क्षेत्रे व तेथील पाण्याच्या पातळीत झालेली घट भरून काढण्यासाठी पाऊस, पाणी संकलन आणि भूजल पुनर्भरण ही काळाची गरज आहे असे मत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी व्यक्त केले. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भूजल पुनर्भरण, पावसाचे पाणी संकलन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त व पर्यावरणदिनाचे औचित्य साधून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाच्या विद्यमाने आयोजित पाऊस पाणी संकलन व भूजल प्रदूषण या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी त्यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये भूजल उपश्यामध्ये झालेली वाढ, भूजल पुनर्भरण, पाणलोट निहाय सध्याची भूजल स्थितीची सविस्तर माहिती दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या उपक्रमाचे कौतुक करुन यासाठी शिवाजी विद्यापीठ सहकार्य करेल, असे सांगितले.भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी स्वागत केले. वॉटर फील्ड रिसर्च फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक संदीप अध्यापक यांनी पाऊस पाणी संकलन व भूजल पुनर्भरण या विषयावर सविस्तर माहिती दिली. पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी भूजल व भूपृष्ठावरील पाणीसाठे व प्रदूषण, नागरी वस्त्यांमुळे होणारे प्रदूषण, औद्योगिकरणामुळे होणारे भूजलाचे प्रदूषण, शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यामुळे होणाऱ्या प्रदुषणाची माहिती दिली. शिवाजी विद्यापीठाचे भूगोल विभाग प्रमुख संभाजी शिंदे यांनी आभार मानले.