शिरोळ : कनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीने गेली सात वर्षे मागासवर्गीय वसाहतीमध्ये १५ टक्के निधीची रक्कम खर्च केलेली नाही. यासह अन्य प्रश्नांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांना धारेवर धरून, त्यांच्या दालनास कडी घालून त्यांना कोंडले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक डी. एच. माने यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली.दरम्यान, १४ व्या वित्त आयोगाचा निधी पाणी योजना, दलितवस्ती कामी खर्च केला जाईल, असे आश्वासन लेखी मिळाले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. धुले यांनी शिष्टाई केल्यानंतर आंदोलन मागे घेतले.मंगळवारी गटविकास अधिकारी देसाई व ग्रामसेविका धुपदाळे यांना कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयात धारेवर धरले. गटविकास अधिकारी दालनासही कडी लावली. चर्चेअंती मार्ग काढू, असे गटविकास अधिकारी देसाई यांनी स्पष्ट केल्यानंतर दालनाची कडी काढली. कनवाड उपसरपंच अख्तर पटेल यांनी लेखी पत्र देऊन १४ व्या वित्त आयोगाचा निधी प्राधान्याने पाणीप्रश्नी खर्च करू, असे आश्वासन दिले. शिवाय गटविकास अधिकारी देसाई यांनी १५ टक्केमागासवर्गीय निधी दलितवस्ती भागात खर्च न केल्याबद्दल दोषींवर कारवाई करून प्रश्न सोडवू, या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. चर्चेत जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे, सुशील कांबळे, उपसभापती वसंत हजारे, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष जयपाल कांबळे, संजय शिंदे, किरण कांबळे, विकास शेषवरे, नितीन खांडेकर यांनी भाग घेतला.(प्रतिनिधी)इतरत्र खर्चकनवाड येथे सन २००९ ते २०१५ या सात वर्षांतील १५ टक्के मागासवर्गीय निधीची रक्कम दोन लाख ५१ हजार रुपये दलितवस्तीवर खर्च न करता इतरत्र खर्च केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गटविकास अधिकारी देसाई यांनी कनवाड दलितवस्तीस भेट देऊन २० दिवसांच्या मुदतीनंतर सांडपाणी निचरा कामे सुरू करू, असे आश्वासन आंदोलकांना दिले होते. या दलितवस्तीत पाईपलाईन घालूनही सांडपाणी निचरा व्यवस्थित होत नाही. शिवाय पिण्याचे पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना कोंडले
By admin | Published: October 06, 2015 11:13 PM