लोकमत न्यूज नेटवर्क
कबनूर : येथील ग्रामपंचायतीने एका फोन कंपनीकडून तेरा लाख रुपये डिपॉझिट भरून घेऊन त्यांना केबल टाकण्यासाठी आझादनगरमधील रस्ता खुदाईस परवानगी दिली होती. केबल टाकून अनेक महिने झाले तरी ग्रामपंचायतीने या रकमेतून रस्ता केलेला नाही. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा न्यायालयात १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी दाद मागावी लागेल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा. अशोक कांबळे यांनी गटविकास अधिकारी हातकणंगले यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात, सरपंच व ग्रामसेवक यांनी तेरा लाख रुपये फोन कंपनीने भरलेल्या डिपॉझिटचे रस्ता दुरुस्त न करता काय केले, याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत नागरिकांच्या सह्याचे निवेदन पाठविले होते. आपल्याकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. या दोघांवर आपणाकडून कारवाई करण्यात आली नाही, तर नाइलाजास्तव न्यायालयात १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी दाद मागावी लागेल. आपण त्यांच्यावर कारवाई केली नसल्याने त्यात आपणास संगनमत असल्याबद्दल सहआरोपी करावे लागेल. तरी आपण त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, असे म्हटले आहे.