कोल्हापूर : दलित समाजाच्या सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून डॉ़ आंबेडकरांच्या स्वप्नातील दलित समाज घडवण्यासाठी एकत्र यावे़ बाबासाहेबांच्या विचारांचे आकलन यापूर्वी झाले आहे़ आता आकलन करण्यात वेळ घालवण्याऐवजी ऐक्याची कृती करा, असे आवाहन अनंत मांडुकलीकर यांनी केले़ दलित ऐक्य चळवळीतर्फे शाहू स्मारक भवन येथे आज, रविवारी आयोजित करण्यात आलेल्या दलित अत्याचारविरोधी दलित ऐक्य परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ मांडुकलीकर म्हणाले, यापूर्वीही दलित ऐक्याचे प्रयोग फसले असले तरी बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आता थांबून चालणार नाही़ सत्तासंपादनासाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली रणनीती सध्याच्या नेत्यांना जमत नाही़ ही रणनीती तडीस नेण्यासाठी दलितांच्या ऐक्याला पर्याय नाही़ दलित ऐक्य चळवळीचे अध्यक्ष मच्ंिछद्र कांबळे म्हणाले, दलित समाजातील शिक्षणाने प्रगल्भ आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींनी चळवळींकडे पाठ फिरवली आहे़ राजकीय नेते वेगवेगळ्या दावणीला बांधलेले असल्यामुळे समाज सत्तेपासून दूर होत चालला आहे़ त्यामुळे गटातटाच्या राजकारणाऐवजी सर्व दलित कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे संघर्ष उभा करावा़येत्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील दलित राजकीय नेत्यांनी एकत्रित लढा न दिल्यास आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते वेगळा विचार करतील, असा इशाराही कांबळे यांनी दिला़ यावेळी दलितांवर होणाऱ्या अत्याचारावर प्रकाश टाकणारी खैरलांजी ते खर्डा ही क्लिपही दाखवण्यात आली़ यावेळी कमलाकर सारंग, सुरेश कांबळे, आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
दलित ऐक्यासाठी गटांनी एकत्र यावे
By admin | Published: January 05, 2015 12:13 AM