करंजफेण :
पश्चिम पन्हाळा परिसरात कोतोलीसह कणेरी, कोलोली, तेलवे, माळवाडी, भाचरवाडी गावात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने रुग्णांची संख्या ५० वर पोहोचली आहे. कणेरी गावात बारा पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले असून, काही रुग्ण अत्यवस्थ असल्याने चिंता वाढली आहे. पन्हाळा-शाहूवाडीचे प्रांताधिकारी अमित माळी यांनी कणेरी गावाला भेट देऊन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना घरी राहून उपचार घेता येणार नसल्याचे सांगून कोविड कक्ष किंवा शाळेमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या, तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेली व्यक्ती तपासणी करून घेण्यास नकार देत असेल तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले, तसेच दूध संस्थेतील कर्मचाऱ्यांना अँटिजन चाचणी बंधनकारक असल्याचे सांगितले.
झपाट्याने रुग्णवाढ होण्यामागे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष हे कारण असून, कोरोना दक्षता समितीच्या दुजाभावामुळे नागरिकांना मोकळीक देत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळेच नवीन समिती गठित करण्याच्या सूचना प्रांताधिकारी माळी यांनी सरपंचांना दिल्या.
फोटो : कणेरी (ता.पन्हाळा) येथे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, तालुका आरोग्याधिकारी अनिल कवठेकर यांनी भेट दिली.
चौकट
कोविड सेंटर उभारण्याची मागणी
पस्तीस गावांचे केंद्र असलेल्या कोतोली येथील खासगी डाॅक्टर व औषध दुकानदारांनी परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी कोविड सेंटर उभारण्याची मागणी केली. कोविड सेंटरला डाॅक्टर, तसेच औषध दुकानदार योगदान देणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.