इस्लामपूर : साखर कारखानदारीला मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य शासनाला घ्यावी लागेल. त्यामुळे साखर विक्रीचा हमीभाव प्रतिकिलो २९ रुपयांऐवजी ३४ रुपये निश्चित करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याच्या साखराळे युनिटच्या २०१८-१९ च्या ४९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आ. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, अतिरिक्त साखर हे या उद्योगासमोरील मोठे संकट आहे. गेल्यावर्षीची १०० लाख क्विंटल साखर शिल्लक असून, यावर्षी साधारण ३०० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. आपल्या देशाची २४२ लाख क्विंटल साखरेची गरज आहे. म्हणजे हा हंगाम संपताना १५८ लाख क्विंटल अतिरिक्त साखर देशात असणार आहे. मध्यंतरी शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिवांना बोलावून साखर उद्योगासमोरील अडचणी सांगितल्या आहेत. सरकारने साखर विक्रीची किंमत ३५०० रुपये केली, तर बरेच प्रश्न सुटणार आहेत. राज्य सरकारने साखर निर्यातीस केंद्र सरकारप्रमाणे वाहतुकीस अनुदान जाहीर करावे. मध्यंतरी मी व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या लवादाने तोडणी मजुरांना सध्याच्या दरावर ५ टक्के वाढ केलेली आहे. आपल्या ‘लक्ष्य १०० टनाचे’ या प्रकल्पास मोठे यश मिळाले आहे.ते म्हणाले, परिपक्व ऊस उत्पादनासाठी शेती विभागामार्फत मार्गदर्शन होणार आहे. लहान शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढविण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाईल. यापुढील काळात ऊस नोंदणी, तोडणी अशी सर्व कामे मोबाईल अॅपच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शीपणे केली जाणार आहेत.