कोल्हापूर : मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहावे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ते दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग), कोल्हापूर येथे पुस्तके वाटपप्रसंगी बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वखर्चाने ही पुस्तके दिली आहेत.मुस्लिम बोर्डिंगतर्फे सर्व बहुजन समाजांत चालविण्यात येणाऱ्या ग्रंथालयांमधील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि समाजातील जास्तीत जास्त मुले व मुली शासकीय उच्चपदावर बसावीत म्हणून मुस्लिम बोर्डिंग ग्रंथालयामध्ये कमी असणारी विविध प्रकारची अद्ययावत एम. पी. एस. सी. व यू. पी. एस. सी. पुस्तकांची मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती.भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई व राहुल चिकोडे यांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी पुस्तके प्रदान केली.चिकोडे म्हणाले, लायब्ररी हा माझा आवडता छंद आहे. मुस्लिम बोर्डिंग ग्रंथालयासाठी गरज लागल्यास आणखी पुस्तके देऊ. गणी आजरेकर म्हणाले, ग्रंथालयामधून ३८ मुले पास झाली. त्यांपैकी सहा मुले मुस्लिम समाजातील व ३२ मुले बहुजन समाजातील आहेत. ग्रंथालयाला पुस्तकांची गरज होती. ती दादांनी देऊन शब्द पाळला. प्रशासक कादर मलबारी यांनी प्रास्ताविक केले.संचालक मलिक बागवान यांनी स्वागत केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष आदिल फरास, नेहरू हायस्कूल स्कूल कमिटीचे चेअरमन लियाकत मुजावर, संचालक जहाँगीर अत्तार, रफिक मुल्ला, मलिक बागवान, हमजेखान शिंदी, पापाभाई बागवान, अल्ताफ झांजी यांच्यासह विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. फारुक पटवेगार यांनी आभार मानले.