साके : बाचणी (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेय घेण्याचा कुणीतरी प्रयत्न करत आहे. या केंद्राला २०१३ च्या बृहद आराखड्यामध्ये मंजुरी मिळाली. त्यावेळी काहींचा राजकीय जन्मही झाला नव्हता, अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केली. ज्यांना कोणतेही संविधानिक पद नाही, निधी नाही, मंजुरीशी काहीही संबंध नाही, अशा लोकांनी भूमिपूजनाचा स्टंट करणे म्हणजे वेडेपणाच आहे, असाही टोला त्यांनी समरजित घाटगे यांचे नाव न घेता लगावला. या आरोग्य केंद्राचे घाटगे यांच्या हस्ते आज मंगळवारी भूमिपूजन होत आहे.मुश्रीफ म्हणाले, या प्राथमिक आरोग्य केंद्राचा बाचणीसह व्हन्नाळी, शेंडूर, साके, केंबळी, बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रूक या गावांना उपयोग होईल. हयात लोकांच्या सेवेसाठी खर्च करणारा मी आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांना तुरुंगात डांबूनच राजकारण करणारी विरोधकांची मानसिकता त्यामुळेच ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशी होणार आहे.
माजी सरपंच सूर्यकांत पाटील म्हणाले, बाचणी केंद्रास मंजुरी आणि उभारणीचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री मुश्रीफ यांनाच जाते. जिल्हा नियोजन समितीकडून ७ कोटीचा निधीही त्यांनीच लावला आहे.अध्यक्षस्थानी सरपंच सूर्यकांत पाटील होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर मनोज फराकटे, बळवंत पाटील, डी. एम. चौगुले, दत्ता पाटील, विकास पाटील, बाळासाहेब तुरंबे, दिनकरराव कोतेकर, नारायण पाटील आदी उपस्थित होते. पीटर डिसोझा यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन आयलू देसाई यांनी केले. केंबळीचे सरपंच विकास पाटील यांनी आभार मानले.
फडणवीस यांचा हवाला देऊन टीका..मंत्री मुश्रीफ म्हणाले, आठवड्यापूर्वीच राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. ते सांगत होते की, समरजित मुंबईला येताना जनसेवेची, पक्षाची कामे कमी आणि टेंडर-बदल्यांचीच कामे जास्त घेऊन यायचे. त्यानंतर आम्हाला समजले की, हे तर कज्जे दलालच आहेत.