कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील आज, शुक्रवारी दुपारी महानगरपालिकेत बैठकीच्या निमित्ताने जात आहे. महानगरपालिका सभागृहाची मुदत संपल्यामुळे शहरातील विकासकामांचा तसेच विविध प्रश्नांचा आढावा पालकमंत्री घेणार आहेत. याकरीता महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक आयोजित केली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपली. त्या आधी मार्च महिन्यापासून कोविड १९ ची साथ सुरू झाल्यामुळे महापालिका हद्दीतील सर्व विकासकामे ठप्प झाली. नवीन वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. पण त्यानुसार विकासकामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. अमृत योजनेतील ड्रेनेजलाईन तसेच जलवाहिन्या टाकण्याची कामे, थेट पाईपलाईनची कामे एकदम संथगतीने सुरू आहेत. नुकत्याच निविदा प्रक्रिया राबवून ४० कोटींची रस्त्यांची कामे सोडली आहेत, पण त्याला अद्याप सुरुवात झालेली नाही. खुद्द पालकमंत्री पाटील यांनीच हा निधी राज्य सरकारकडून आणला आहे.
अंदाजपत्रकातील कामे निधी नाही म्हणून थांबविण्यात आली आहेत तर निधी उपलब्ध असलेली कामे ठेकेदारांनी सुरू केलेली नाहीत तसेच कामांची गती संथ ठेवली आहे. लवकरच महानगरपालिका निवडणूक होत असून ही कामे मार्गी लागणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठीच ही आढावा बैठक होणार आहे.