कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या बायोमायनिंग प्रकल्पाला नागरिकांचा असलेला विरोध पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी देवर्डे मळा येथे झालेल्या बैठकीनंतर मावळला. नागरिकांच्या शंकांचे निरसन झाल्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात होणार होईल.दरम्यान, शहरात रोज गोळा होणाऱ्या २२० टन कचऱ्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावा. कचऱ्यावर शास्त्रीय प्रक्रिया करीत असताना प्रकल्पाच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्या. झूम प्रकल्पावर साचलेले ढीग तत्काळ मोकळे करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.लाईन बझार येथील कचरा प्रकल्पास पालकमंत्री पाटील यांनी महापालिकेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी यांच्यासमवेत जाऊन पाहणी केली तसेच तेथे होत असलेल्या कचरा प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, डॉ. विजय पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.डॉ. विजय पाटील यांनी प्रकल्पाची माहिती दिली. नियोजित ५३ टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाची माहितीही त्यांनी दिली. सध्या २२० पैकी १८० टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असून, उर्वरित ४० टन कचऱ्यावर नवीन ५३ टनांचा प्रकल्प सुरू झाल्यावर प्रक्रिया होईल, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. या कामाबद्दल पालकमंत्री पाटील यांनी समाधान व्यक्त केले.कचरा डेपोवर वर्षानुवर्षे साचून राहिलेल्या कचऱ्यावर केल्या जाणाऱ्या बायोमायनिंग प्रक्रियेची माहिती आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सांगितली. बायोमायनिंग प्रक्रिया करण्याकरिता सहा मशिनरी आलेल्या आहेत. त्यांचे काम लवकरच सुरू केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी हरकत घेतली.
हा प्रकल्प देवर्डे मळा येथे न करता सध्या कचऱ्यावर जेथे प्रक्रिया केली जाते तेथेच बायोमायनिंग प्रक्रिया करावी, अशी सूचना नागरिकांनी केली. नागरिकांनी विरोध करू नये. वर्ष दीड वर्षात या परिसरातील कचऱ्याचा विषय संपून जाईल, माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन आयुक्तांनी केले.त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी देवर्डे मळ्यात जाऊन तेथील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी तेथील महिलांनी जोरदार हरकत घेत नागरी वस्ती असलेल्या बाजूला बायोमायनिंग प्रकल्प करू नका, अशी सूचना केली. दुर्गंधी येते, कुत्र्यांचा त्रास होतो, कचरा रस्त्यावर पडतो, धूर व धुळीचा त्रास होतो, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यावेळी या तक्रारी दूर करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचना
- बायोमायनिंग प्रकल्प राबविण्यापूर्वी योग्य खबरदारी घ्या.
- देवर्डे मळ्याच्या बाजूला दगडी संरक्षक भिंत घालावी.
- संरक्षक भिंतीच्या वर २० फूट उंचीचे पत्रे उभे करावेत.
- बायोमायनिंग प्रकल्प हा पत्र्याच्या शेडमध्ये बंदिस्त करावा.
- रिकाम्या जागेत पुन्हा ओला कचरा टाकू नका.
- देवर्डे मळ्यातील रस्ते रोजच्या रोज स्वच्छ करावेत.
चार ठिकाणी कचरा संकलन : आयुक्तशहरात रोज गोळा होणारा २२० टन कचरा लाईन बझार येथे एकाच ठिकाणी न आणता तो शहराच्या चार कोपऱ्यांत साचवून त्याच ठिकाणी त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. बापट कॅम्प, शेंडा पार्क, पुईखडी, लक्षतीर्थ वसाहत या ठिकाणी तो साठवून तेथेच त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल. सध्या तीन ठिकाणी अशा प्रकारे यंत्रणा कार्यान्वित असून, ती यशस्वी झाली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.५० टनांपर्यंत ओल्या कचऱ्यांवर प्रक्रियासध्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता ३० टनांचा प्रकल्प सुरू असून, ही क्षमता आणखी २० टनांनी वाढविण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. १५० टनांवर सुक्या कचऱ्यांवर प्रक्रिया केली जात असून, यापुढील काळात बायोमायनिंग प्रक्रिया करून येथील कचऱ्यांचे ढीग मोकळे केले जातील. येथील विघटन न होणारा कचरा टाकाळा येथे टाकला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.