कोल्हापूर : पालकमंत्र्यांनी आपल्या अट्टहासामुळे कोल्हापूरला कोरोनाच्या खाईत लोटले आहे, असा आरोप करतानाच थेट पाइपलाइनवरून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा कोल्हापुरातील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन रविवारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, अजित ठाणेकर, विजय खाडे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की, मार्चमध्ये ५०० च्या खाली असलेला रुग्णांचा आकडा गोकुळच्या निवडणुकीनंतर झपाट्याने वाढला. त्यामुळे कोरोनावाढीसाठी पालकमंत्रयांचा गोकुळ निवडणुकीबाबतचा आडमुठेपणाच कारणीभूत आहे, हे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या मागच्या लाटेवेळी दिसलेली प्रशासनाची सक्रियता यावेळी कोठेही दिसत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.गोकुळच्या निकालानंतर घाईगडबडीने लागू केलेला आणि कोणताही शास्त्रीय आधार नसलेला एक आठवड्याचा लॉकडाऊन पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे खरोखरीच अंमलबजावणी होते आहे का, हे एकदा पालकमंत्र्यांनी जमिनीवर उतरून पाहावे, असे आवाहनही पत्रकात केले आहे.
यावर्षी दिवाळीला कोल्हापूरवासीयांना अभ्यंगस्नानास थेट पाइपलाइनचे पाणी देऊ, अशी घोषणा केली होती. आता सहा महिन्यांनी त्यांनी पुन्हा सहा महिने वाढविले आहेत. पालकमंत्र्यांनी योजनेला भेट दिली तेव्हा पाऊस सुरू झाला होता आणि काम थांबले होते. तरीही पालकमंत्र्यांनी २०२२ जानेवारीत योजना पूर्ण होईल, असे म्हणणे म्हणजे जनतेची शुद्ध दिशाभूल आहे, असे पत्रकात म्हटले आहे.