कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करुन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवावी यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
या ठिकाणी पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध करुन सरकारला धडा शिकविण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. मोर्चातकोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर येथील वृत्तपत्र विक्रेते मोठयासंख्येने सहभागी झाले होते.दुपारी दोनच्या सुमारास महावीर उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा विजय असो, हम सब एक है, कल्याणकारी मंडळाची स्थापना झालीच पाहीजे, हमारी युनियन...हमारी ताकद, अशा घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, असेंब्ली रोड, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, वटेश्वर मंदीर चौकमार्गे कावळा नाका येथील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर नेण्यात आला.
या ठिकाणी ठिय्या आंदोलन करुन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसह सरकारवर सडकून टीका केली. मोर्चासंदर्भात कळवूनही उपस्थित न राहील्याबद्दल पालकमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध करुन येणाºया काळात सरकारला धडा शिकवून असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पालकमंत्र्यांसह सरकारविरोधात घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.विभागीय रघुनाथ कांबळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंदोलने करुन निवेदनही देण्यात आले आहे, परंतु या बहिऱ्या सरकारला ऐकू येत नाही. त्यामुळे त्यांचे कान उघडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.सरकारने वेळीच दखल न घेतल्यास वृत्तपत्र विक्रेते धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.सल्लागार शिवगोंडा खोत म्हणाले, वृत्तपत्र विक्रेता आता जागा झाला असून त्यांनी आता पालकमंत्र्यांसह सरकारविरोधात तोंड उघडल्यास काय हालत होइल हे लक्षात घ्या.मोर्चासंदर्भात कळवूनही पालकमंत्री उपस्थित न राहील्याबद्दल त्यांचा निषेध आहे.त्यांच्याकडून काय होईल असे वाटत नाही. त्यामुळे आपल्याला आता २७ जानेवारीला नागपूर येथे होणाºया वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अधिवेशनात आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. आपला आवाजा आमदार-खासदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी आतापासूनच करावी लागेल.आंदोलनात विभागीय उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी (सांगली), कोषाध्यक्ष गोरख भिलारे (पंढरपूर), स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटना जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते, संगघट शंकर चेचर, कोल्हापूर शहर महानगर संघटना अध्यक्ष रवी लाड शिवाजी मगदूम, आप्पा पाटील (कोल्हापूर), प्रशांत जगताप (सांगली), उत्तम चौगुले (सोलापूर) आदींसह वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते.