लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ऐन कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी रात्रीचा दिवस करणारे कोल्हापूरचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची साथ पूर्णत: आटोक्यात आल्यानंतर मंगळवारी त्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी स्वत:च ट्विट करून त्याची माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईत खासगी रुग्णालयात ते उपचार घेत असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे कुटुंबांशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांना दोनच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ गृहराज्यमंत्र्यांनाही त्याची लागण झाल्याने खळबळ उडाली. पालकमंत्री पाटील हे प्रजासत्ताक दिन सोहळा केल्यानंतर २६ जानेवारीला दुपारनंतर मुंबईला रवाना झाले होते. त्यांच्या मुलीचा अमेरिकेतील पदवी प्रवेश घेण्यासाठी ते त्याच रात्री मुलीसह अमेरिकेस रवाना झाले. प्रवेश निश्चिती करून ते ७ फेब्रुवारीस भारतात परतले. त्यानंतर विमानतळावर त्यांची चाचणी झाल्यानंतर त्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. गेले बारा दिवस ते कुणाच्याच संपर्कात नसल्याने अन्य कुणाला त्यांच्यापासून धोका नसल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर ते स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून बसले होते. त्याशिवाय सीपीआरसह अनेक रुग्णालयांना ते भेटी देत होते. जिल्ह्याची यंत्रणा राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या काळात कोरोनापासून स्वसंरक्षण करण्यात ते यशस्वी झाले होते.