कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कपूर वसाहतीची जागा बळकावण्याचा सतेज पाटील प्रयत्न करत आहेत, असा अपप्रचार काही भंपक माणसांनी केला. जागा बळकवायला मी काही महाडिक नाही. हीच कपूर वसाहत मी झोपडपट्टीधारकांच्या नावावर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे, अशा शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कदमवाडी येथील विजयी सभेत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
विधानसभेच्या पाेटनिवडणुकीत जयश्री जाधव विजयी झाल्याबद्दल कदमवाडीतील विठ्ठल चौकात जाहीर सत्कार करून विजयी सभा घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री बोलत होते.
विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी कदमवाडी, भोसलेवाडी, कपूर वसाहत परिसरात विरोधी उमेदवाराने अपप्रचार केला. दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, तरीही या भागातील मतदारांनी त्याला भीक घातली नाही. त्याला कदमवाडीतच रोखले. आता या भागातील विकासकामे करण्याची आमची जबाबदारी आहे. मतदान करायला घाबरला नाहीत, आता विकासकामे करायला घाबरू नका. विकासकामांचे नारळ फोडताना कोणी दडपशाही करायला लागला, गुंडगिरी करायला लागला, तर मला बोलवा. पाच मिनिटांत येथे येतो. बंटी पाटलांचे दांडके अजून घट्ट आहे, असा इशाराही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिला.
प्रश्न सोडविल्याशिवाय मतं मागणार नाही
कदमवाडी परिसरातील सर्व प्रश्न सोडविल्याशिवाय महानगरपालिकेला मते मागायला येणार नाही, असा शब्द हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिला, तर पालकमंत्री पाटील यांनीही बी टेन्युयरचा विषय निकाली काढण्यासाठी पुढील काही दिवसांत विशेेष शिबिर घेण्याचे आश्वासन दिले.
दिवाळीची पहिली आंघोळ थेट पाइपलाइनेच
काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचा उल्लेख करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूरकरांचे थेट पाइपलाइनचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. टीकाकार कितीही टीका करू देत; पण आम्ही कोल्हापूरकरांना यंदाच्या दिवाळीतील पहिली आंघोळ ही थेट पाइपलाइनच्या पाण्यानेच घालणार आहोत. यावेळी आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, भीमराव पोवार, राजू लाटकर, भारती पोवार यांची भाषणे झाली.
आमचं नातं ब्लॅकमेलिंगचं नाही
आमचं नातं ब्लॅकमेलिंगचं नाही, आमचं नातं दुसऱ्याला धमकावण्याचं नाही, तर आमचं नाते दुसऱ्यांची कामं करण्याशी आहे, शहराची विकासकामे करण्याशी आहे. म्हणून तर जयश्री जाधव यांना निवडून देण्याचा, तसेच ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना खटक्यावर बोट जाग्यावर पलटी करण्याचा निर्णय येथील जनतेने घेतला होता, असे पालकमंत्री म्हणाले.
प्रचाराचा विषारी प्रयोग महागाई, बेरोजगारी वाढत असताना, दुसरीकडे धार्मिक तेढ निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न, तसेच महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा आणि त्यातून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न राज्यात केला जात असल्याचा घणाघात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतही जातीयवादी प्रचाराचा विषारी प्रयोग केला गेला, परंतु येथील स्वाभिमानी जनतेने तो हाणून पाडला, असे मुश्रीफ म्हणाले.
तरीही माकड म्हणतंय माझीच लालविधानसभा निवडणुकीत तब्बल १९ हजार मतांनी जनतेने पराभव केला तरीही माकड म्हणतंय माझीच लाल. नाटकं तरी किती करायची? नाटकं करत होता म्हणूनच जनतेने तुम्हाला घरी बसविले. एवढेच नाही तर पुढील कोणत्याही निवडणुकीत तुम्ही निवडून येणार नाही, अशा शब्दात भारती पोवार यांनी सत्यजित कदम यांचे नाव न घेता समाचार घेतला.