कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहरातील गृह विलगीकरण केलेल्या रुग्णांशी फोनवरून आणि व्हिडिओ कॉल करून संवाद साधून विचारपूस केली. यावेळी रुग्णांनी प्रशासनाकडून योग्य सहकार्य होत असल्याचे सांगितले.
कोल्हापूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासकीय पातळीवर आवश्यक सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोल्हापूर शहरातील ६३ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. या रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून योग्य सेवा, मार्गदर्शन मिळते का नाही याबाबत पालकमंत्री पाटील यांनी रुग्णांशी, फोनच्या माध्यमातून आणि व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी वेगवेगळ्या गृह विलगीकरण असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. रुग्णांनी महापालिका प्रशासनाकडून आपल्याला योग्य सहकार्य केले जात असल्याचे सांगितले. आरोग्य यंत्रणा आपल्यापर्यंत वेळेत पोहोचून आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन केले. डॉक्टरांचीही चांगली मदत होत असल्याचे सांगितले.