कोल्हापूर : काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आम्ही शहरासाठी १२०० कोटींचा विकास निधी आणला. पालकमंत्र्यांकडे दोन नंबरचे खाते असताना गेल्या चार वर्षांत त्यांनी कोल्हापूर शहरासाठी किती निधी आणला, थेट पाईपलाईनच्या परवानग्या अडविल्या आहेत. घोषणेप्रमाणे तीर्थक्षेत्र आराखड्यास निधी द्यावा. त्यांनी राजकारण सोडून शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. महापालिकेची सत्ता मिळत नसल्याचे शल्यही त्यांना बोचत असल्याचे त्यांनी सांगितले.बुधवार पेठ, शनिवार पेठ व शुक्रवार पेठांतील नागरिकांतर्फे रविवारी महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांचा सत्कार मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. पद्माराजे विद्यालयाच्या पटांगणात सत्कार समारंभ झाला.सतेज पाटील म्हणाले, जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढले असेल तर त्या प्रमाणात शहराच्या विकासासाठी पैसे द्या. त्यासाठी राजेश क्षीरसागर यांनी महापौर व उपमहापौर यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी तरीही निधी दिला नाही; तर मात्र महापालिका म्हणून उच्च न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी महापौर निवडीवेळी नगरसेवकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला; पण तो आम्ही हाणून पाडला. पैशांनी माणसे विकत घेता येत नाहीत. हे उद्योग बंद करा, ते खपवून घेणार नाही. आता वर्षभरात तुमची दुकानदारी बंद होणार असल्याची टीका क्षीरसागर यांनी पालकमंत्री पाटील यांचे नाव न घेता केली.महापौर सरिता मोरे यांनी, विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी अॅड. महादेवराव आडगुळे, आर. के.पोवार, मारुतराव कातवरे, नंदकुमार मोरे, किरण शिराळे, उमा बनछोडे, प्रतापसिंह जाधव, रविकिरण इंगवले उपस्थित होते.‘मातोश्री’च्या आदेशाची धास्तीमहापौर निवडीत ‘मातोश्री’वरून काय आदेश येतो आणि राजेश क्षीरसागर काय भूमिका घेतात, आमचा घोटाळा उडतो की काय ? याबाबत धास्ती होती, असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांनी राजकारण सोडून विकासाकडे लक्ष द्यावे: हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:53 AM