कोल्हापूर : पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नितीश पाटील यांच्या अपघाती मृत्यूनंतर मस्कत प्रशासनाकडून पाठविण्यात आलेला ‘डीडी’ गहाळ झाल्याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी नव्याने आलेल्या ‘डीडी’ची २३ लाख ३९ हजार ही रक्कम आपल्या खात्यावरून ‘आरटीजीएस’ प्रणालीद्वारे वारसांच्या खात्यावर हस्तांतरित केल्याची माहिती दिली. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे त्यांच्या कुटुंबीयांना गेल्या नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ हक्काच्या पैशांसाठी धडपड करावी लागली. त्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी सर्वप्रथम कै. नितीश यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. त्यांना ही रक्कम देऊन प्रशासन कर्तव्य पार पाडेलच; परंतु ज्यांच्यामुळे पूर्वीचा ‘डीडी’ गहाळ झाला त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या बॅँक खात्यावर ‘डीडी’ची रक्कम शुक्रवारी जमा झाली. ही रक्कम ‘आरटीजीएस’ प्रणालीद्वारे वारसांच्या बॅँक खात्यावर हस्तांतरित केल्याचे सैनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘डीडी’ गहाळप्रकरणी कारवाई करू : पालकमंत्री
By admin | Published: November 07, 2015 11:34 PM