आंबा : कोल्हापूरच्या निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांना सह्याद्रीच्या डोंगरमाथ्याबरोबर, ग्रामीण जीवन, निसर्ग व रांगडा इतिहास नजरेसमोर यावा म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘आडवाटेवरचे पर्यटन’ या नावाने अनोख्या दोन दिवसीय सहलीच्या संकल्पनेला मूर्त रूप दिले. त्यांचा कोल्हापूरकर लाभ घेत आहेत. नुकतेच चंद्रकांत पाटील यांनी आडवळणावरचे निसर्गसौंदर्य सहपत्नी अनुभवले.दररोजची गर्दी, धावपळ, कार्यकर्त्यांचे मोहोळ थोडे बाजूला ठेवून सकाळी आठला कुशिरे येथील पांडवकालीन लेणी पाहण्यास पर्यटकांची सोबत होती. वाघबिळ मार्गे पावनखिंड या ऐतिहासिकस्थळी दादासोबत ही सहल सकाळी दहा पन्नासला पोहोचली. शाहीर गिरीश सावंत यांच्या रांगड्या आवाजात येथील नरवीर बाजीप्रभूंचे शौर्य शिवप्रेमींच्या अंगावर शहारे उठवणारे ठरले. यावेळी पन्हाळा ते पानवखिंड या ऐतिहासिक पदभ्रमंती मार्गावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, आंबवडे येथे सभागृह व शौचालय सुविधा उपलब्ध करीत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.बाजीप्रभूंच्या पुण्यतिथीनिमित्त पावसाळ्यात होणाऱ्या पदभ्रमंती धारकºयांना सेवा-सुविधा पुरविण्याची ग्वाही दिली. येथील बाजीप्रभू तरुण मंडळाचे सचिव सुभाष पाटील यांनी येथे पर्यटन विकासातून पर्यटकांना पाणी, वीज, निवासव्यवस्था उभारण्याची गरज मांडली. येथील शिवाजी विहीर, फरसबंदी रस्ता पाहून ही सहल येळवण-जुगाई मार्गे अनुस्कुरा या रमणीय खेड्याकडे वळली. तेथे उगवाई मंदिराला भेट देऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे मान्य केले. येथे पांडवकालीन शिलालेख व सातवाहन कालीन रस्त्याची पाहणी करीत ही सहल तिसंगी येथील महिला बचतगटांनी तयार केलेल्या ग्रामीण व घरगुती सहभोजनाचा स्वाद घेतला. आसळज फाटा येथील महाराष्ट्रातील मोठी विरगळ पाहिली. पळसंबे-सांगशी येथे शिलालेख अभ्यासून चक्रेश्वर येथे आकाशदर्शन करून काळांबाईवाडी येथे ही सहल मुक्कामी राहिली.कोल्हापूरकरांसह लातूर, पुणे, यवतमाळ, अमरावती येथील पर्यटकांनी महसूल मंत्र्यांसोबत एक दिवसाच्या सहलीचा आनंद घेतला. या सहलीत हिल रायडर्स फांैडेशनचे प्रमुख प्रमोद पाटील, अनिल चौगुले, राहुल चिक्कोरे, बी. बी. यादव, उदय गायकवाड या तज्ज्ञांचे सहलीत मार्गदर्शन लाभले.सहलीसोबत सुविधांच्या पूर्ततेची दृष्टी...ग्रामीण भागात पर्यटन व्यवसाय पोहोचविताना तेथील तरुण, महिला बचतगटांना रोजगार मिळावा व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याची तयारी दर्शविली. या सहल मार्गावरील रस्ते, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटनाच्या सुविधा पूर्ण करण्याचे धोरण पालकमंत्र्यांनी जाहीर केले. कोल्हापूरचे वैशिष्ट्य ठरलेली ‘आडवाटेवरची निसर्ग व ऐतिहासिक सहल’ महाराष्ट्रातील पर्यटकांना एक अनोखी भेट ठरेल. येथील वनसंपदा, ऐतिहासिक वारसा, कृषी पर्यटन, ग्रामीण संस्कृतीचा ठेवा, विविध कला हे कोल्हापूरच्या पर्यटन विकासातील मैलाचे दगड आहेत. ग्रामीण विकासाला हे पूरक ठरणारे आहेत, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
ग्रामीण पर्यटन विकासाला पालकमंत्र्यांची दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:10 AM