कोल्हापूर : शहरात करण्यात आलेल्या रस्तेविकास प्रकल्पाचे राज्य सरकारच्या सूचनेनुसार मूल्यांकनासह रस्त्यांचा दर्जा तपासण्याचे काम सुरू आहे, तोपर्यंत टोलवसुली करू नये, अशी सूचना आयआरबी कंपनीला केल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तथापि, पालकमंत्र्यांनी दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत निवेदन करून कोल्हापूर सोडताच आयआरबी कंपनीने शहरातील सर्व नाक्यांवर अचानक टोलवसुली सुरू करून पालकमंत्र्यांच्या सूचना धुडकावून लावली. पालकमंत्री यांनी दुपारी निवेदन करून कोल्हापूर सोडले. पालकमंत्री जाताच आयआरबीने टोलवसुली सुरू केली. कोणी काहीही सांगितले तरी आम्ही गप्प बसणार नाही, असेच जणू त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. विशेष म्हणजे पालकमंत्री कोल्हापुरात येऊन जाणे आणि आयआरबीने टोल सुरू करणे या गोष्टी योगायोगाने घडल्या, की हे सर्व ठरवून केले, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला. आज, सोमवारी नियोजन मंडळाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांनी आयआरबीने केलेल्या खराब रस्त्यांबाबत पालकमंत्र्यांना छेडले. आयआरबीकडून खराब दर्जाचे रस्ते होत असताना ते रोखण्याकरिता पालकमंत्री कोठे दिसले नाहीत, असे विचारता केल्यावर ते पत्रकारांवरच खेकसले. ‘पालकमंत्री म्हणून मी काय करायला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे? प्रत्येक गोष्टीत पालकमंत्र्यांनी लक्ष घातलेच पाहिजे का?’ असे उलटे प्रश्नच त्यांनी पत्रकारांना केले. ‘मी रस्तेविकास प्रकल्पाच्या कामात पहिल्यापासून आहे. रस्ते खराब होत होते, तर पत्रकार त्यावेळी कोठे होते?’ असा सवालही त्यांनी केला. यावेळी उपस्थित पत्रकारांनीही पालकमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘शहरात चुकीची कामे होत होती, त्यावेळी वर्तमानपत्रांनीच त्यांवर आवाज उठविला. म्हणूनच कोल्हापुरात आंदोलन उभे राहिले. सरकार आणि पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नव्हती का?’ असे पत्रकारांनी सुनावल्यावर पालकमंत्री निरुत्तर झाले. अखेर त्यांनी पत्रकारांवरील आक्षेप मागे घेतला. टोलबाबत जनतेत संभ्रम आहे. कोल्हापूर-सांगली रस्त्याबाबतही अशीच परिस्थिती आहे. तेथे काम बंद आहे. जनतेच्या भावनेची कदर सरकारला करावीच लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांची सूचना धाब्यावर
By admin | Published: June 17, 2014 1:26 AM