कोल्हापूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान छुपा क्रिकेट सट्टा व मटका-जुगार जोमाने सुरू होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शहरातील पाचही पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना मुख्यालयात बोलावून आज, सोमवारपासून मटका बुकी मालकांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मटका बुकी मालकांसह पंटरांची धरपकड करण्याचे पोलिसांनी नियोजन केले आहे. दरम्यान, क्रिकेट सट्ट्याचा मुख्य सूत्रधार व महापालिकेचा विरोधी पक्षनेता नगरसेवक मुरलीधर जाधव याच्या मोबाईल कनेक्शनवरूनच मटक्याचा बुकीमालक सम्राट कोराणेसह आठजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. टाकाळा येथील नगरसेवक जाधव यांच्या जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये २३ जानेवारीला राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकला असता पंटर प्रकाश श्रीचंद जग्याशी व लक्ष्मण सफरमल कटयार हे दोघे आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेताना मिळाले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये या बेटिंगचा मुुख्य सूत्रधार नगरसेवक जाधव असल्याचे निष्पन्न झाले. सट्ट्याचे प्रशिक्षण आरोपी कोणाकडे घेतात, त्यांचे आणखी कोणाकोणाशी लागेबांधे आहेत, सट्ट्याकरिता लागणारे भांडवल त्यांनी कुठून उपलब्ध केले, आदी मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी मुख्य सूत्रधार जाधव याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.जाधवसह त्याच्या पंटरांचे मोबाईलवरून कोणाशी संभाषण झाले, त्याची माहिती घेतली असता त्यामध्ये मटका बुकीमालक कोराणे याचा समावेश असल्याचे दिसून आले. त्यानुसार सम्राट सुभाष कोराणे (रा. वेताळ तालीम परिसर, शिवाजी पेठ), अरिंजय बाबूराव शेटे (रा. नागाळा पार्क), कन्हैया रूपचंद कटियार, राकेश लालचंद नागदेव, रमेश धनुमल वाधवाणी (सर्व रा. गांधीनगर), शिवकुमार बसरमल सुंदराणी (रा. ताराबाई पार्क), नितीन सुनील ओसवाल (रा. भवानी मंडप), विनायक अशोक बोभाटे (कागलकर चाळ, दाभोळकर कॉर्नर), या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रमुख शर्मा यांच्याकडून झाले. बेटिंगची सूत्रे गांधीनगरातून क्रिकेट बेटिंगमध्ये सट्टा खेळण्यासाठी गांधीनगरमधील काही बड्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. हे व्यापारी घरी बसून एजंटांद्वारे मोबाईलवरून सट्टा लावीत असतात. येथील काही पंटरांचे मुंबईतील बुकीमालकांशी थेट संपर्क असल्याने गांधीनगरमधून बेटिंगची सूत्रे हलविली जात आहेत. पोलीस रेकॉर्डवर आलेले आरोपी हे बहुतांश गांधीनगरमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील एका विशेष पथकाला गांधीनगरमधील छुप्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोराणेचे पोलिसांशी लागेबांधेजुना राजवाडा पोलिसांनी सम्राटवर यापूर्वी मटक्याचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी कोराणेवर उचललेल्या कारवाईच्या बडग्याने अवैध व्यावसायिकांचे मात्र धाबे दणाणले आहे.
मटकामालक, पंटरांची आजपासून धरपकड
By admin | Published: February 16, 2015 12:17 AM