सावंतवाडी : वाढती महागाई, गुन्हेगारी व जिल्ह्यातील खुंटलेल्या विकासाला पालकमंत्री दीपक केसरकरच जबाबदार असून, १९ जानेवारीला आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँगे्रसच्यावतीने पालकमत्र्यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे आवाहन तालुका काँग्रेस अध्यक्ष संजू परब यांनी केले आहे. माजी खासदार नीलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अॅड. दिलीप नार्वेकर, संदीप कुडतरकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, साक्षी वंजारी, दिलीप भालेकर उपस्थित होते. जिल्ह्यातील रखडलेला विकास व वाढती महागाई, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, पालकमंत्री दीपक केसरकर हे जिल्ह्याबाहेरच राहत असतात. शासकीय अधिकाऱ्यांवरही त्यांचा वचक नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकत नाहीत. पालकमंत्री केसरकर हे पदापुरतेच पालकमंत्री आहेत. जिल्ह्यात येऊनही ते सर्वसामान्य जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवत नाहीत. यामुळेच काँग्रेस तालुक्याच्यावतीने त्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सावंतवाडी तालुक्याचे हजारो कार्यकर्ते, नागरिक सहभागी होणार आहेत. या आंदोलनाची सुरूवात माजी खासदार नीलेश राणे यांच्या कार्यालयाकडून सकाळी १० वाजता होणार असून, पालकमंत्री केसरकर यांच्या येथील श्रीधर अपार्टमेंट निवासस्थानी मोर्चा नेण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या अध्यक्षपदाची सुरूवात आरोंदा जेटीला भेट देऊन करावी. आरोंदा जेटीला त्याठिकाणच्या भाजप नेत्यांचाच विरोध आहे. त्याठिकाणी जठार यांनी जाऊन भेट द्यावी. विनाशकारी आरोंदा जेटीला पाठिंबा न देता स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी जठार यांनी पेलावी व नंतरच आंदोलनावर टीका करावी, असे संदीप कुडतरकर यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन
By admin | Published: January 18, 2016 12:53 AM