कोल्हापूर : शिवराज्याभिषेकदिनी ६ जून रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीमध्ये गुढ्या उभारण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम करतानाच प्रत्येक जिल्हा परिषदेत त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते गुढी उभारावी, असे पत्रक शुक्रवारी शासनाने काढले आहे.
मुश्रीफ यांनी १ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेशानुसार शिवराज्याभिषेक दिन राज्यभर साजरा करणार असल्याचे जाहीर केले होते. याबाबत आता ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढले असून पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत गुढी उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे सादरीकरण करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला खुद्द हसन मुश्रीफ उपस्थित राहणार असून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते गुढी उभारण्यात येणार आहे.