कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे नागरिकांना निर्बंधात राहतच सण-उत्सव साजरे करावे लागले. मात्र आता कोरोनाचा संसर्ग पूर्णत: ओसरल्याने शासनाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर निर्बंध उठवले. त्यामुळे आज मोठ्या थाटामाटात गुढीपाडवा सण साजरा होत आहे. पहाटे-पहाटेच नागरिकांनी घरो-घरी गगनचुंबी गुढी उभारल्या. तर, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजरात शहरातून शोभायात्रा निघाल्या. यामुळे सर्वत्र आनंदीमय, चैतन्यपुर्ण वातावरण होते.
यातच, कोल्हापुरातील एका शिक्षकाने अनोखी गुढी उभा केली. ती म्हणजे ज्ञानाची गुढी. राजेंद्र बनसोडे असे या शिक्षकाचे नाव आहे. ते शा.कृ.पंत वालावलकर हायस्कूलमध्ये क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली तीन वर्ष ते असी अनोखी ज्ञानाची गुढी उभारतात. यात सर्वच प्रकारची प्रबोधनात्मक पुस्तके, शाहू, फुले, आंबेडकर यांचे ग्रंथ असतात. विशेष करुन या ज्ञानरुपी गुढीत स्पोर्टस् च्या पुस्तकांचा समावेश असतो.
ज्ञानाची गुढी सर्वत्र रुजावी या संकल्पनेतूनच क्रीडाशिक्षक बनसोडे यांनी गेल्या तीन वर्षापासून ही अनोखी गुढी उभा करण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी गुढी उभारताना ५० पुस्तके, दुसऱ्या वर्षी ८० पुस्तके तर यंदाच्या वर्षी त्यांनी १२५ पुस्तकांची ही गुढी उभी केली आहे. तर वर्षी यात ५० पुस्तके वाढवण्याचा त्यांचा संकल्प आहे.