तानाजी घोरपडे - हुपरी चांदी व्यावसायिकांचे कायद्याबद्दलचे अज्ञान, परपेठेवरील सराफाला पोसण्यासाठी व्यवहारचातुर्याला बगल देत केला जाणारा धोकादायक व्यवहार, धीटपणाचा अभाव, पोलिसांच्या दडपशाहीला घाबरून पत्करणारी शरणागती, कायदेविषयक सल्लागार व चांदी कारखानदार असोसिएशनला विश्वासात न घेण्याचा प्रघात, या सर्व घटनाक्रमांचे अनुकरण चांदी व्यावसायिकांकडून केले जात असल्यानेच देशातील अनेक राज्यांतील पोलीस येथील व्यावसायिकांना चुकीच्या पद्धतीचा अवलंब करून ‘चांदी तस्कर’ ठरवित आहेत.या संकटातून मार्ग काढून चांदी व्यावसायिकांना संपूर्ण देशभर निर्भयपणे व्यापार करता यावा, यासाठीचे वातावरण तयार करण्यासाठी चांदी कारखानदार असोसिएशन व कायदेविषयक कर सल्लागारांनीच एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक चांदी उद्योजकांनी ‘लोकमत’कडे परखडपणे व्यक्त केल्या. याप्रश्नी ‘लोकमत’मधून ‘चांदी व्यावसायिकांवर तस्करीचा ठपका’ असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची रौप्यनगरीसह परिसरातील सर्वच गावांतून जोरदार चर्चा झाली होती.देशातील सर्वच व्यापारी पेठेवरून सराफाकडून आलेल्या मागणीनुसार चांदीचे दागिने तयार करून पोहोच करण्याचा व्यवसाय हुपरीसह परिसरातील गावातून मोठ्या प्रमाणात चालतो. त्याबदल्यात कच्ची चांदी व मजुरीची रक्कम स्वीकारण्यात येते. अशा प्रकारचा साधा-सोपा व्यवहार केला जात असतानाही काही राज्यांतील पोलीस चांदी व्यावसायिकांची अडवणूक करून कोणत्याही आधाराशिवाय त्यांना चांदी तस्कर म्हणून ताब्यात घेतात. पोलिसांच्या या दडपशाही वृत्तीचा अपेक्षाभंग न्यायालयात आपोआपच होतो. मात्र यातून विनाकारण चांदी व्यावसायिकांना नाहक त्रास होते.चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक म्हणाले, चांदी व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. परपेठेवर जात असताना सोबत घेऊन जाण्यासाठी असोसिएशनने ओळखपत्र फाईल दिली आहे. व्यवसायाबाबत वेळोवेळी मार्गदर्शनही करण्यात येते. परपेठेवर पोलिसांकडून अडवणूक झालेल्या अनेक घटनावेळी आम्ही त्याठिकाणी जाऊन सोडवणूक केली आहे. कर सल्लागार एम. टी. देसाई व एस. आर. गुळवणी म्हणाले, काही घटनांमध्ये चांदी व्यावसायिकांबरोबर त्या-त्या राज्यातील पोलिसांचीही चूक असते. अनेकवेळा चांदी व्यावसायिकांकडून आपली बाजू मांडणे किंवा व्यवसायाची कागदपत्रे पुरावे सादर करण्यामध्ये विलंब केला जातो तसेच पोलिसांकडून या पुराव्याला काहीवेळा दाद दिली जात नाही. मात्र, हेच पुरावे न्यायालय ग्राह्य मानते, अशा घटना घडत असतात. अशा घटना घडू नयेत यासाठी आमच्याकडून वेळोवेळी योग्य त्या सूचना दिल्या जातात. मात्र, व्यावसायिकांकडून त्या सूचनांचे पालन केले जात नाही. परिणामी अशा समस्यांना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो.
चांदी व्यवसाय सुलभतेसाठी हवे मार्गदर्शन
By admin | Published: February 18, 2015 11:26 PM