कोल्हापूर : ग्रामीण भागामध्ये आपला व्यवसाय सांभाळून सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेच्या प्रगतीचे आकडे पाहिल्यानंतर या संस्थेचे काम दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी काढले.आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवव्या आणि कोल्हापुरातील दुसऱ्या कसबा गेट शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. लईस शहा होते. एकूणच पतसंस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेताना काकडे म्हणाले, गरजेतून पतसंस्थांची निर्मिती झाली आणि त्या विश्वासाच्या पाठबळावर टिकल्या. मध्यंतरी या संस्थांच्या भवितव्याबाबत जोरदार चर्चा झाली. मात्र २०१५ नंतर महाराष्ट्र शासनाने केलेल्या सर्वच पतसंस्थांच्या कडक तपासणीनंतर आता टिकणाऱ्या संस्थाच तेवढ्या शिल्लक राहिल्या आहेत. २००७ पासून स्वामी विवेकानंद पतसंस्थेची वाटचाल मी पाहत आहे. नेमक्या पद्धतीने सभासदांच्या हिताचा विचार करून संस्थेचे कामकाज सुरू आहे. कोकण विभागामध्ये तर स्वामी विवेकानंद पतसंस्था ही दिशादर्शक ठरली आहे.अध्यक्ष अॅड. लुईस शहा म्हणाले, माझा आणि या संस्थेचा ऋणानुबंध अनेक वर्षांचा आहे. बदलत्या परिस्थितीतही पतसंस्था टिकणे गरजेचे आहे. मध्यंतरी या चळवळीबाबत गैरसमज निर्माण झाले. मात्र त्यावेळी फारच एकांगी मांडणी करण्यात आली. पतसंस्थेचे विश्वस्त म्हणून काम करण्याची गरज आहे.संस्थेचे चेअरमन जनार्दन टोपले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, २०० सभासद आणि ५० हजार रुपयांच्या ठेवींवर सुरू झालेल्या या संस्थेचा वार्षिक व्यवसाय आज १५० कोटींच्या घरात आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह भादवण, पेरणोली, मुंबई, सावंतवाडी, कोल्हापूर येथे स्वमालकीच्या शाखा इमारती आहेत. कोल्हापुरातील आझाद चौक शाखा ही सर्वसामान्य महिलांसाठी आधारवड ठरली असून, याच भूमिकेतून कसबा गेट शाखाही काम करील.यावेळी जागामालक सुभाष पाटील, इंजिनिअर नितीन सोहनी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले; तर संस्थेचे माजी अध्यक्ष मलिककुमार बुरुड यांनी आभार मानले.कार्यक्रमाला संस्थेचे व्हाइस चेअरमन दयानंद भुसारी, संस्थेचे माजी अध्यक्ष बापू टोपले, हरी नार्वेकर, तुकाराम कोटकर, सुभाष नलवडे, ज्येष्ठ संचालक नारायण सावंत, रवींद्र दामले, रामचंद्र्र पाटील, महेश नार्वेकर, सुधीर कुंभार, संजय घंटे, सुरेश कुंभार, राजेंद्र चंदनवाले, प्रेमा सुतार, माधवी कारेकर, आझाद चौक शाखा चेअरमन सुनील निकम, जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार, शाखा व्यवस्थापक नारायण बेहरे यांच्यासह सल्लागार उपस्थित होते.