कोल्हापूर : ग्रामीण साहित्याचा बाज वेगळा आहे. या ग्रामीण भागातील लेखकांच्या लेखणीमधून निर्मित होणारे साहित्य समाजाला दिशा देणारे आहे. जे घडलं, जे सोसलं त्याचे प्रतिबिंब विजय पाटील लिखित ‘आम्ही जगाचे कैवारी’ या पुस्तकात स्पष्टपणे उमटले आहे. समाजाला अशा साहित्याची गरज आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांनी गुरुवारी केले.
येथील वाचनकट्टा निर्मित आणि विजय शहाजी पाटील लिखित ‘आम्ही जगाचे कैवारी’ या पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशनावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. या पुस्तकाचे लेखक विजय पाटील यांच्या हातामध्ये असणारा पाना त्यांची लेखणी बनला आहे. या दर्जेदार लेखणीतून आणखी साहित्याची मांडणी व्हावी, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. विजय पाटील हे बदलाला सामोरे जाणारे लेखक असून त्यांची पहिली साहित्यकृती आम्ही जगाचे कैवारी वाचकांना आवडेल असा आशावाद डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी सदिच्छा फाउंडेशनचे सुहास रोमाने, कौस्तुभ यादव, सचिन मुळे, विष्णू पावले, संजय पाटील, आनंद पाटील उपस्थित होते. वाचनकट्ट्याचे संकल्पक युवराज कदम यांनी प्रास्तविक केले. बी. डी. कुंभार यांनी आभार मानले.
फोटो (१९०७२०२१-कोल-आम्ही जगाचे कैवारी पुस्तक) : शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘आम्ही जगाचे कैवारी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी डॉ. डी. टी. शिर्के, विजय पाटील, इंद्रजित देशमुख, युवराज कदम आदी उपस्थित होते.