आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0८ : नागाळा पार्क येथील एका हॉटेलच्या दारात सोमवारी दुपारी एमएच-१० -एएन-६४४३ या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर चारचाकी गाडीवर अंबर दिवा अनाधिकृत लावल्याचे प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ या गाडीवरील दिव्यास गुलाबपुष्प वाहून गांधीगिरी पद्धतीने निषेध केला. या घटनेनंतर गाडीमालकाने हा दिवा काढून घेतला.
बेकायदेशीररीत्या अनुज्ञेय नसणारा दिवा लावून फिरणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात ा प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने गांधीगिरी पद्धतीने दिव्याला काळी फीत व गुलाबपुष्प बांधून आंदोलन पुकारले होते. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी दुपारी नागाळा पार्क येथील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये एम.एच.१०-एएन-६४४३ या स्विफ्ट डीझायर गाडीवर अंबर दिवा लावला होता. ही बाब प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ गाडीवरील दिव्यास या गुलाबपुष्प वाहत काळी फित बांधली. काही वेळानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर गाडी क्रमांक घातला असता ही गाडी तानाजी. एन.जाधव (रा. सांगली) यांच्या नावे असून या गाडीवर राजाराम सहकारी बँकेचे कर्ज आहे. असे पुढे आले. त्यामुळे ही गाडी एखादा पोलिस अधिकारी अनाधिकृतरित्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरत असल्याचे पुढे आले.
यावेळी दिलीप देसाई यांनी बेकायदेशीररित्या अनुज्ञेय नसणारा दिवा प्रदर्शित करणाऱ्या या अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली जाणार असल्याची माहीती प्रसार माध्यमांना दिली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आल्यांनतर गाडीवरील दिव्यास गुलाबपुष्प वाहील्यानंतर गाडीभोवती बघ्यांची गर्दी जमली होती. गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केल्यानंतर हॉटेलमध्ये जेवण्यास गेलेल्या या गाडीमालकाने हा दिवा काढून घेतला.
शासनाच्या ४ एप्रिल २०१७ च्या निर्णयानुसार बेकायदेशीर अनुज्ञेय नसणारा दिवा प्र्रदर्शित केल्यास त्यावर प्र्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्वरित कारवाई करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या खटल्यामध्ये नमूद केला आहे. यासंबधी संघटनेने ४० पेक्षा जास्त छायाचित्रे अनुज्ञेय नसताना अंबर दिवे प्रदर्शित केल्याबद्दलची तक्रार प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली आहे. मात्र, या तक्रारीची दखल या विभागाने घेतलेली नाही. त्यामुळे बेकायदेशीर दिवे प्रदर्शित करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात संस्थेच्यावतीने यापुढेही गांधीगिरीपद्धतीने आंदोलन सुरुच ठेवू असे देसाई यांनी जाहीर केले आहे.