म्हाकवे : स्वतःचे दहा बाय दहाचे घर गळके असतानाही बेनिक्रे (ता. कागल) येथील ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरावर छत व्हावे, या श्रध्देपोटी निराधार असणाऱ्या गुणाबाई दिनकर पोवार यांनी पाच हजारांची देणगी देऊन लोकवर्गणी उभारणीचा प्रारंभ केला. रोजंदारी आणि शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या पोवार यांच्या दातृत्वाचे मान्यवरांसह ग्रामस्थांनी कौतुक केले.
अर्जुनवाडा येथे विवाह झालेल्या गुणाबाई या अनेक वर्षांपासून बेनिक्रे येथेच राहतात. लहानशा खोलीत आपल्या संसारासह शेळ्याचे पालन करत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून भावेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धाराची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कमाईतील पै-पै जमा करण्यास सुरुवात केली. ती जमलेली पुंजी त्यांनी आज मंदिर कमिटीकडे दिली. त्यांच्या दातृत्वाची दखल ग्रामविकासमंत्र्यांसह भाजपाध्यक्ष समरजित घाटगे, वीरेंद्र मंडलिक यांच्यासह सर्वच नेतेमंडळींनी घेतली. घाटगे व मंडलिक यांनी तर गुणाबाई यांच्या घरात जाऊन तिच्या दातृत्वाबाबत कौतुक केले. दरम्यान, पांडुरंग गुरव यांच्याकडे या देवीच्या पूजेचा मान असून, त्यांच्या पत्नी सरपंच अश्विनी गुरव यांच्याहस्ते पुजा होऊन बांधकामाचा प्रारंभ झाला.
कँप्शन
बेनिक्रे येथील शेतमजुरी करून मंदिर बांधकामासाठी पाच हजारांचा निधी देणाऱ्या गुणाबाई पोवार यांची भेट घेताना समरजित घाटगे, वीरेंद्र मंडलिक, जयवंत पाटील आदी.