कोल्हापूर : महानगरपालिकेत पक्षीय राजकारण आल्यावर शहराचा विकास होईल, पालिकेतील राजकारणाला शिस्त लागेल, अशी भाबडी आशा बाळगून जनतेने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडून दिले खरे; परंतु तेथे विकासकामे होण्याऐवजी पक्षीय अभिनिवेशच अधिक पाहायला मिळत आहे. काही कारभारी नगरसेवकांची दादागिरी अधिकाऱ्यांची डोकेदुखी बनली असून, त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे. आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नगरसेवकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनात संतापाची तीव्रता खदखदत आहे. सध्या तरी ‘प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी’ असा संघर्ष तीव्रतेने समोर आला आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत चार अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, काही अधिकाऱ्यांनी बदली करून घेतली, तर असंख्य अधिकारी आजही दबावाखाली काम करीत आहेत. प्रशासनाकडे ज्या फायली अडकलेल्या आहेत, त्या क्लीअर करून द्याव्यात म्हणून प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकांनी उपायुक्त विजय खोराटे यांच्यावर ज्या पद्धतीने दबाव टाकला, जर त्या फायली नियमांत बसणाऱ्या असतील तर त्या क्लीअर करून पुढे पाठवा म्हणून सांगण्याचीही गरज नाही. अधिकाऱ्यांचे ते कामच आहे. मग त्यासाठी एवढे आकांडतांडव करण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला. आमच्या फायली जर नियमांत बसत असतील तर त्या क्लीअर कराव्यात, असे त्यावेळी प्रा. पाटील यांचे म्हणणे होते; परंतु त्यांचा आग्रह संशयाचे वातावरण निर्माण करून गेला. महिला बाल कल्याण समिती सदस्य व सभापतींची निवड घेऊ नये म्हणून तत्कालीन सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्या प्रामाणिकपणाचा उद्धार केला गेला, त्यावेळी त्यांना धमकावण्यातही आले. न्यायालयाने दिलेला निर्णय डावलून आम्ही सांगतो म्हणून प्रक्रिया थांबवा म्हणणे योग्य नाही. न्यायालयाचा आदेश मानून उमेश रणदिवे यांनी ती प्रक्रिया राबविली. त्यामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रचंड रोषाला बळी पडावे लागले. त्यातून त्यांनी नोकरीचा राजीनामाच दिला. पक्षीय राजकारणाचा परिणाम महापालिकेत कॉँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजप-ताराराणी आघाडी विरोधी बाकांवर आहे; परंतु खासदार धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाची लागण महापालिकेलही झाली आहे. पूर्वी निवडणूक झाली की सर्वजण एक होऊन काम करीत होते; पण अलीकडे हा संघर्ष तीव्र झाला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेविका ताराराणी-भाजपच्या नगरसेविकांबरोबर साधे बोलतानाही दिसत नाहीत. ताराराणी-भाजपचे नगरसेवक एखाद्या विषयावर आयुक्तांना भेटले की त्याच विषयावर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवकही लगेच भेटतात. खासदार महाडिक यांनी एक बैठक घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी आमदार पाटील यांनी बैठक घेतली. एवढी कटुता नगरसेवकांत निर्माण झाली आहे. निवडणूक संपल्यावर राजकारण सोडून देणे आवश्यक आहे; परंतु अजूनही हे राजकारण नगरसेवकांना चिकटूनच आहे.
महापालिकेत गुंडाराज; अधिकारी त्रस्त
By admin | Published: September 25, 2016 1:11 AM