लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहर व परिसरातील चार हजार गुंठेवारी नियमितीकरणाची प्रकरणे तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहेत. अशा प्रकरणी गुंठेवारीच्या मोजणीसाठी नगरपालिकेकडील अभियंता प्रतिनियुक्तीवर देऊन ही प्रकरणे मार्गी लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना दिले.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला आमदार सुरेश हाळवणकर, उपजिल्हाधिकारी नंदकुमार पाटकर, प्रांताधिकारी समीर शिंगटे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन देसाई, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार, हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती रेश्मा सनदी, जिल्हा परिषदेच्या सदस्या विजया पाटील, आदी उपस्थित होते.बैठकीमध्ये इचलकरंजीतील घोडकेनगर येथील मालमत्ताधारकांची नावे प्रॉपर्टी कार्डाला नोंद करण्याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे अपील दाखल करून निर्णय घ्यावा. आंबेडकरनगर येथील मालमत्ताधारकांच्या प्रॉपर्टी कार्ड व सात-बारा उताऱ्यावर असलेली म्हसोबा देवस्थानची नोंद कमी करावी आणि मालमत्ताधारकांची नावे लावण्याबाबत चौकशी करून कार्यवाही करावी. कोरोची येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन व कबनूर येथील गायरान भूखंडावर झोपडपट्टी नियमित करण्याबाबत चर्चा झाली. इचलकरंजी शहरातील मंजूर झालेले विशेष रस्ते अनुदानातील प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी. शहापूर खणीचे सुशोभीकरण व तेथील स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यास मान्यता देण्यात आली.
गुंठेवारीची कामे मार्गी लावा
By admin | Published: June 02, 2017 12:06 AM