कोल्हापूर : मौजे बालिंगा (ता. करवीर) येथील रि.स.नं. ५३, २, मो. र. नं. २४८९ या जमिनीवरील करवीर तहसीलदार यांचा गुंठेवारी आदेश व अभिन्यास (लेआऊट) रद्द व्हावा, अशी मागणी शिवसेनेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. या प्रकरणातील अर्जदार व्यक्तीचे ३० डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले आहे,. तरीही तत्कालीन करवीर तहसीलदार यांनी १७ नोव्हेंबर २०१४ रोजी एका सात बाराचे तीन गुंठेवारी आदेश दिले आहेत. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने सादर झाल्याचे आढळल्यानंतर शिवसेनेने सध्याचे भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनी हे प्रकरण रद्द केले. या प्रकरणील गुंठेवारी अभिन्यास मंजूर करण्याचा अधिकार नगररचना साहाय्यक संचालक यांचा असताना, अनेक प्रकरणांत तहसीलदार यांनी आपल्या सहीशिक्क्यासह तो कोणत्या अधिकारात मंजूर केला याची चौकशी होणे गरजेचे आहे. हे एक बोगस प्रकरण पुढे आले आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत अशी अनेक प्रकरणे झाली असतील. यामुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडालाच; शिवाय बोगस प्रकरणातील प्लॉट खरेदी केलेल्या सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. तरी तत्कालीन तहसीलदार व भूमी अभिलेख उपअधीक्षकांवर गुन्हे दाखल करून महसूल वसूल करावा व त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवाजीराव जाधव, सुजित चव्हाण, संदीप घाटगे, अभिजित बुकशेठ, प्रवीण पालवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
---
फोटो नं १८०८२०२१-कोल-शिवसेना
ओळ : शिवसेनेच्या वतीने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना मौजे बालिंगा (ता. करवीर) येथील बनावट गुंठेवारी आदेश रद्द व्हावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजी जाधव, विजय देवणे, संजय पवार, सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.
---