समीर देशपांडे
कोल्हापूर : आनंदा शिवणे, मूळ गाव चिमणे, ता. आजरा, जि. कोल्हापूर. घरची स्थिती बेताची. थोडीफार शेती, ज्यावर आई-वडील आणि चार भावांची गुजराण अशक्य. चौथीपर्यंत गावात शिक्षण. नंतरच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न उभा ठाकला. अशावेळी गावातीलच शिक्षक, कार्यकर्ते सु. रा. देशपांडे यांनी गवसे (ता. आजरा) येथे आश्रमशाळेत घातलं. तिथं सातवीपर्यंत शिक्षण झालं आणि पुन्हा गावात.दहावीनंतर मुंबई; पण तिथे मन रमेना. पुन्हा गावात; पण करणार काय? मग पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. मोठे भाऊ धोंडिबा हे सार्वजनिक बांधकाम विभागात होते. त्यांच्या ओळखीने छोटी-मोठी कामे सुरू झाली. अशातच सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमाही पूर्ण केला. एका कंत्राटदाराकडे सुपरवायझर, दुसऱ्या कंपनीत नोकरी केली; पण स्वतंत्र व्यवसाय करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती.त्यातूनच ते इचलकरंजीला आले. नातेवाइकांबरोबर कंत्राटदार म्हणून काम सुरू केले; पण अनुभव बरा आला नाही आणि तीन लाखांचे कर्ज घेऊन परत पुण्याला जावे लागले. पुन्हा त्यांनी कंपनीत कामे घ्यायला सुरुवात केली. आनंद कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली. आज या कंपनीची वर्षाला आठ ते नऊ कोटींची उलाढाल आहे. चाकण येथे इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, जिथं ५०० मुले शिकतात. सांगवी येथे हॉटेल सुरू केले आहे.जो माणूस स्वत:ला स्थिरस्थावर होण्यासाठी नोकरी कशी मिळेल, याच्या शोधात होता, त्यानेच आज सुमारे १५० जणांना रोजगार दिला आहे. लहानपणापासून घरची जी परिस्थिती पाहत आलो, त्याच परिस्थितीने मला घडविले. नोकरी करताना जे अनुभव आले, त्यातून शिकता आलं. त्यामुळे ही परिस्थिती आणि अनुभव हाच माझा मोठा गुरू आहे, असं आनंदा शिवणे सांगतात.