नृसिंहवाडी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुद्वादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात आदी अनेक राज्यांतून हजारो भाविकांनी श्रीदत्त पादुकांच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी येथील शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या नद्या मिळून तयार झालेली पंचगंगा तसेच कृष्णा व वेण्णा अशा सात नद्यांच्या पवित्र संगमावर औदुंबर वृक्षातळी तब्बल बारा वर्षे महाराजांनी येथे तपसाधना केली व कृष्णा नदीच्या काठावर असलेली आठ तीर्थे भक्तोधारासाठी प्रकाशात आणली. त्यानंतर मनोहर पादुकांच्या रूपाने आपण सदैव येथे वास करू असा भक्तांना आशीर्वाद दिला. या मनोहर पादुकांच्या स्थापनेचा दिवस म्हणजेच गुरुद्वादशी होय व श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या अवतार समाप्तीचा दिवसदेखील गुरुद्वादशी असल्याने येथील उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी अनेक राज्यांतून गुरू-शिष्य परंपरेतील भक्तांनी एकत्र येऊन येथील पवित्र नदीमध्ये स्नान केले. अनेकांनी पंचामृत अभिषेक, ध्यानधारणा, जप आदी अनुष्ठाने केली.
गुरुद्वादशी उत्सवानिमित्त श्रीदत्त मंदिरात पहाटे काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी पंचामृत अभिषेक, दुपारी श्रींच्या चरणकमलावर महापूजा, धूप, दीप, आरती, इंदुकोटी, नैवेद्य व महाप्रसाद होऊन सायंकाळी पवमान पंचसुक्त पठण झाले. रात्री कीर्तन व धूप, दीप, आरतीनंतर पालखी सोहळा संपन्न झाला.