करंजफेण : गावापासून उंच अंतरावर असलेल्या डोंगर माथ्यावरील गवताच्या माळरानावर उभ्या असलेल्या उंड्री (ता. पन्हाळा) येथील जि.प.च्या मराठी शाळेच्या इमारतीची अवस्था म्हणजे गळक्या छताबरोबर पाण्याअभावी ओसाड पडलेला लाल मातीचा ओसाड भाग. त्यामुळे सातत्याने सुरू असलेली मुलांची गळती, मुलांमधील निरुत्साहपणा ही परस्थिती बदलण्याचा ध्यास उंड्री येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक बळवंत पाटील यांनी घेतला आहे.
जिल्हा परिषद शाळेची चित्र बदलण्याची नुकतीच कल्पना मांडून ते थांबले नाहीत, तर तब्बल अडीच लाख रुपये स्वखर्चातून वापरून त्यांनी गावातील शाळेचे चित्रचं बदलून टाकले आहे. ग्रामपंचायतीने मुबलक पाण्याची सोय केल्याने शाळेच्या अंतरंगाबरोबर बाह्यरंग बदलल्याने ओसाड परिसरात वेगवेगळ्या फुलांची, फळझाडांची व शोभेच्या झाडांची लागवड करून, योग्य संगोपन करून प्रशस्त क्रीडांगणासह त्यांनी या शाळेला कॉपोर्रेट लुक दिला आहे.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने स्वप्रयत्नातून शाळेचा कायापालट केल्याने त्यांचे या परिसरात कौतुक होत आहे. या शाळेत मुलांसाठी बगीचा, वेगवेगळी आकर्षक भिंत्तीचित्रे असलेल्या बोलक्या भिंती, साऊंड सिस्टीम, महापुरुषांचे पुतळे, परिपाठासाठी सभामंडप, संरक्षक जाळी, सभोवताली संरक्षण भिंत, असे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की, ही एक जि.प.ची शाळा आहे. या शाळेमध्ये सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात आले आहे. तसेच मुलांच्या सुरक्षेच्यादृृष्टीने संपूर्ण शाळा परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविलेली ही कदाचित पन्हाळा तालुक्यातील पहिलीच जि.प. शाळा आहे.
शाळेची इमारत पावसाळ्यात नियमित गळती होती. मुलांची गैरसोय होत होती. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याची गरज होती. पाटील यांनी शासनाच्या निधीची वाट न पाहता स्वखर्चाने सिमेंट काँक्रिटच्या साह्याने दोन खोल्यांच्या छताची दुरुस्ती करून घेतली. त्यानंतर शाळेचे रूपच पालटण्याचा त्यांनी जणू चंगच बांधल्याने त्यांना सहकारी शिक्षकांनी मोलाची साथ दिल्यामुळे बघता-बघता या शाळा परिसराचा संपूर्ण कायापालटच झाला आहे.
शाळेने शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रामध्ये नियमित ‘अ’ मानांकन दर्जा टिकविल्यामुळे शाळेची सर्व ठिकाणी दखल घेतली जाऊ लागली आहे . त्यामुळे शाळेला स्वच्छ सुंदर शाळेचा पुरस्कार मिळाला आहे. या शाळेकडे आता अनेकांच्या नजरा खेळू लागल्याने जिल्ह्यातील मान्यवरांच्या शाळेला आता भेटी घडू लागल्या आहेत. तसेच गावच्या शाळेत अचानक बदल झालेला पाहून गावकऱ्यांतून शाळेसाठी वस्तू रूपाने मदतीचा ओघ सुरू आहे.
निधीअभावी अनेक अडचणी येत होत्या; परंतु मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन इतर शिक्षकांच्या सहकार्याने स्वखर्चाने शाळेत आमूलाग्र बदल घडवून आणला असल्यामुळे मुलांमध्ये उत्साह व शाळेबद्दल ओढ निर्माण झाली आहे. अपुºया खोल्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास आणखीन सोईचे होणार आहे.- विजय मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उंड्रीउंड्री येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट झाला आहे.