कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ६२६ जागा रिक्त असताना जिल्हा परिषदेच्या पातळीवर प्रत्येकाची सोय बघण्याचे काम सुरू असल्याने शाहूवाडीसारख्या दुर्गम तालुक्यात जाण्यास शिक्षक तयार नसल्याचे चित्र समोर आले आहे. शिक्षण विभागाचे कडक धोरण नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.
शाहूवाडी तालुक्यातील कुंभवडे ग्रामस्थांनी शुक्रवारी शाळेत शिक्षकच न आल्याने थेट मुलांना घेऊन पंचायत समिती गाठली. दिवसभर पंचायत समितीमध्ये मुले बसवून ठेवली. तालुक्यामध्ये गरजेपेक्षा सुमारे १५0 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. अशातच कुंभवडेचे शिक्षक न सांगता रजेवर गेल्याने अखेर मुलांना घेऊन ग्रामस्थांना पंचायत समिती गाठावी लागली.
सध्या जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या ८0५८ शिक्षकांपैकी ६२५ जागा रिक्त आहेत. उर्दू माध्यमाच्या २३, तर खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या ३६ जागा रिक्त आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षकच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अजून नव्या भरतीला सुरुवात नाही.
अशात बदली होऊन आलेले, परजिल्ह्यात गेलेले, जिल्ह्यांतर्गत बदली झालेले शिक्षक, अशा सर्वांचा विचार करता गेले वर्षभर जिल्हा परिषदेमधील सर्वाधिक वावर हा प्राथमिक शिक्षकांचा राहिला आहे. दरवेळी कोणत्या ना कोणत्या नियमाचा आधार घेत शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड या तालुक्यांकडे जाणे टाळण्याचे काम सुरू असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत दिसत आहे.जिल्हा परिषदेचे पदाधिकारीही गावागावांतील शाळांना कमी संख्येने असले तरी पुरेसे शिक्षक कसे मिळतील, हे पाहण्यापेक्षा शिक्षकांची सोय कशी होईल, हे पाहण्यामध्येच गुंतले असल्याचा आरोप आता जिल्हा परिषद सदस्यांकडूनच होऊ लागला आहे.माध्यमिकचे अतिरिक्तही नाखूशमाध्यमिक शाळांमधील अतिरिक्त २२ शिक्षकांना गेल्या महिन्यात प्राथमिक शिक्षक म्हणून आदेश देत त्यातील काहींची शाहूवाडी तालुक्यात नियुक्ती करण्यात आली. मात्र, यातील काहीजण शाहूवाडीत हजरच झालेले नाहीत; परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.सभापती, शिक्षणाधिकाऱ्यांचे एकमत नाहीप्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे या पुण्याहून कोल्हापुरात बदलून आल्या आहेत. त्या येण्याआधी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ हे या विभागाचे काम पाहत होते; परंतु शिक्षण सभापती अंबरीश घाटगे आणि आशा उबाळे यांच्यामध्ये अनेक बाबतीत एकमत होत नसल्याने घाटगे यांचा कल अडसुळ यांच्याकडून कामे करून घेण्याकडेच आहे. त्यामुळे अनेकदा शिक्षकांच्याबाबतीत झालेल्या निर्णयांची माहिती उबाळे यांना नसते.दोषींवर कारवाईकुंभवडे शाळेतील शिक्षक वरिष्ठांना न सांगता रजेवर गेले आहेत. कितीही अडचणी आल्या तरी याबाबतचा निरोप देणे आवश्यक होते.तसेच तालुका पातळीवरील एकही शाळा विनाशिक्षक राहू नये याची जबाबदारी गटशिक्षणाधिकºयांची आहे. मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेणार असून, यातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे उबाळे यांनी सांगितले.
कारवाईस टाळाटाळज्या शिक्षकांना आदेश दिल्यानंतरही ते हजर होत नाहीत, ज्यांनी चुकीची माहिती भरून सोयीच्या बदल्या करून घेतल्या आहेत. अशा शिक्षकांवर तातडीने कडक कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक शिक्षक बदलीसाठी जिल्हा परिषदेत शाळेच्या वेळेत येत असताना तो शिक्षक रजा टाकून आला आहे का, हे विचारण्याची तसदीही अधिकारी घेत नसल्याचे चित्र आहे.
...तर मग शाहूवाडीकडे जाणार कोण?काहीही झाले तरी शाहूवाडी, चंदगड, गगनबावडा या तालुक्यांत टाकू नका, अशी मागणी करणारे अनेक शिक्षक आणि शिक्षिका गेले अनेक महिने जिल्हा परिषदेत फेºया मारत आहेत. पदाधिकाºयांचा वशिला आणि इतर नियमांचा आधार घेत या डोंगराळ तालुक्यात न जाण्यासाठीच अधिक ताकद लावली जात असल्याचे दिसून येते. शाहूवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी मुख्य कार्यकारी अमन मित्तल यांची भेट घेऊन शिक्षक देण्याची मागणी केली होती.