राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर -‘जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी’ असलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था (कोजिमाशि) व प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची पुढील आठवड्यात प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. साधारणत: मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता असल्याने गुरुजींच्या राजकारणाला वेग आला आहे.‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह बारा शाखा कार्यरत आहेत. गेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दादासाहेब लाड, सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जयंत आसगावकर व बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वाभिमानी’ आघाडी, एम. एम. गळदगे, राम पाटील, गणपतराव बागडी, बी. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी तर राजेंद्र रानमाळे, शिवाजीराव सावंत, शिवाजीराव चौगले, धर्माजी सायनेकर, प्रा. चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये ‘स्वाभिमानी’ आघाडीने बाजी मारली होती पण गेल्या पाच वर्षांत सत्तारूढ गटातील समीकरणे बदलली आहेत. प्रा. आसगांवकर, बाबा पाटील यांनी लाड यांच्याशी फारकत घेतली आहे. राजेंद्र रानमाळे यांनी शाहू आघाडीशी जुळवून घेत ‘राजर्षी शाहू परिवर्तन’ आघाडीची मोट बांधत सत्तारुढांसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. मतांची गोळाबेरीज पाहता प्रा. आसगावकर व बाबा पाटील यांच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे. शिक्षक बँकेसाठी गतनिवडणुकीत शिक्षक समिती, संघ व पुरोगामी संघटना यांच्यात सामना झाला होता. तत्कालीन संचालकांच्या कारभारावर थेट हल्ला चढवत विद्यमान अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी बँकेवर एकहाती पकड घेतली. पण त्यांनी शिक्षक संघाच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि त्यांचे बँकेच्या राजकारणातील शत्रू एकवटू लागले. गेले दोन वर्षे त्यांना घेरण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. राजकारणातून संघात तिसऱ्यांदा फूट पडल्याने त्याचे परिणाम थेट बॅँकेच्या राजकारणावर होणार आहेत. शिक्षक समिती, पुरोगामी संघटना, संघ (वरुटे गट), संघ (थोरात गट) या चार गटांनी तयारी केली आहे. शिवाजीराव पाटील यांचा गटही कार्यरत असून बँकेचे माजी अध्यक्ष ए. के. पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. परीक्षांच्या कालावधीत निवडणुकाशिक्षक बँक व ‘कोजिमाशि’ पतसंस्थेसाठी मतदान परीक्षांच्या कालावधीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान एकतर फेबु्रवारीत अन्यथा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यासाठी शिक्षक संघटनांमधून प्रयत्न सुरू आहेत.
गुरुजींचे राजकारण तापणार
By admin | Published: January 05, 2015 12:09 AM