कोल्हापूर : दिवसभराच्या कडक उष्णतेच्या झळा आणि घामांच्या धारांवर रविवारी चारनंतर आलेल्या वादळी पावसाच्या हलक्या सरींनी गारव्याची फुंकर घातली. ढगांच्या गडगडाटासह आलेल्या या पावसाने कुठे तुरळक, तर कुठे काहीशा जोरदार सरींचा वर्षाव झाला.
रविवारी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. तापमानाचा पारा ३९ अंशाच्याही पुढे गेला होता. दुपारी दीडपासूनच वातावरण बदलू लागले. तीनपासून एकदम अंधारून आले आणि कुठे ढग उतरेल तेथे पावसाच्या सरी कोसळल्या. ढगांचा गडगडाटही सुरूच होता. संध्याकाळपर्यंत वातावरण कुंदच राहिले. दरम्यान, हवामान खात्याने या आठवड्यात वादळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. विशेषत: या आठवड्याच्या शेवटी शनिवार, रविवार, सोमवार असा वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सध्या उन्हाळी पिकांची काढणी सुरू आहे. त्यातच दुपारनंतर हमखास पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. उन्हाळी सोयाबीनची काढणी सुरू असून पावसात भिजू नये म्हणून मळण्या वेगावल्या आहेत. सूर्यफुलाची भरणी सुरू असतानाच सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल असे दिसत आहे. उन्हाळी भाताच्या लोंब्याही आता भरू लागल्या असून लवकरच कापणी सुरू होणार आहे. जोराचा पाऊस झाल्यास ती झडण्याची भीती आहे.