गांधीनगर : पुणे-बेंगलोर महामार्गावर कर्नाटकातून कराडकडे जात असलेल्या टेम्पोमधून अवैधरीत्या वाहतुकीत आढळलेला साडेएकवीस लाख रुपयांचा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू (गुटखा) आणि टेम्पो, असा एकूण ३३ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गांधीनगर पोलिसांनी रविवारी सकाळी दहाच्या सुमारास उचगावजवळ केली. टेम्पो चालक जमीर हारुण पटेल (वय 38, रा. कराड) याला ताब्यात घेतले आहे. गांधीनगर पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावरून कराडमध्ये तंबाखू, पान मसाला वाहतूक होणार असल्याची माहिती गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस नाईक आकाश पाटील, मोहन गवळी, आयूब शेख, यांना याबाबत माहिती देऊन सापळा रचण्यास सांगितले. सकाळी दहाच्या सुमारास उचगाव येथील महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळच्या खणीनजीक टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो पकडून त्याची झडती घेतली असता या टेम्पोमध्ये हिरा कंपनीचा पान मसाला आणि रोयॉल 717 कंपनीच्या तंबाखूची 100 पोती बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असलेला गुटखा सापडला. या मालाची किंमत २१ लाख ४४ हजार १६८ रुपये असून टेम्पोसह एकूण ३३ लाख ४४ हजार १६८ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी टेम्पो चालक जमीर पटेल याच्याविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या कारवाईप्रकरणी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन कारवाईचे कौतुक केले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस नाईक आकाश पाटील, पो.हे.काॅ. मोहन गवळी, विराज डांगे, सुभाष सुदर्शनी, पो.ना. आयूब शेख, दिगंबर सुतार, चेतन बोंगाळे यांनी केली.
फोटो ओळ- गांधीनगर पोलिसांनी अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करून 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी करवीरचे डीवायएसपी आर. आर. पाटील, गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि सत्यराज घुले, पो.हे.काॅ. मोहन गवळी, पो.ना. आकाश पाटील, आयूब शेख, चेतन बोंगाळे व इतर कर्मचारी उपस्थित होते. (छाया : बाबासाहेब नेर्ले)