कोल्हापूर : राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा सरचिटणीस एच.डी. बाबा उर्फ हिंदूराव धोंडीराम पाटील (वय ७८) यांचे त्यांच्या कोल्हापूरातील रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी गुरुवारी पहाटे साडेचार वाजता निधन झाले. गेले वर्षभर ते आजारी होते. ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी मानले जात होते.
राजकिय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. समाजात ते एच.डी. बाबा या नावानेच सर्वत्र परिचीत होते. १९८० च्या दशकात कॉग्रेस (एस) हा पक्ष पश्चिम महाराष्ट्रात वाढविण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत काम केले. पक्षाचे काम जिल्ह्याच्या कानाकोपºयात पोहचविण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यावेळी ते काँग्रेस (एस)चे जिल्हाध्यक्ष व महाराष्टÑ प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी याच पक्षाच्या माध्यमातून १९८५ मध्ये करवीर विधानसभा निवडणूक लढविली होती.
१९९० ते ९५ च्या दरम्यान ते महाराष्टÑ राज्य विद्युत महामंडळाचे संचालक होते. त्यावेळी कोकण विभागात अनेक ठिकाणी वीजनिर्मीती केंद्रे उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी महाराष्टÑ राज्य शेती महामंडळाचे ते सदस्य होते.राष्टÑवादी काँग्रेस पक्ष स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. त्यावेळी त्यांनी राष्टÑवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहीले. राजकिय, सामाजिक क्षेत्रासह त्यांचे क्रीडा क्षेत्रातही मोलाचे योगदान आहे. कोल्हापूर जिल्हा कब्बडी असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
गेले दोन महिने ते श्वसन विकाराने त्रस्त होते, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली, गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी , तीन विवाहित मुले असा परिवार आहे.
गुरुवारी सकाळी त्यांची रुईकर कॉलनीतील निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीव देहावर अंत्यसस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी ९ वाजता आहे. अत्यंयात्रेत खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय मंडलीक, माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, नगरसेवक सत्यजीत कदम, माजी नगरसेवक अनिल कदम, उद्योगपती बाबाभाई वसा, जवाहरभाई वसा, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यासह राजकिय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.रविवारी सर्वपक्षीय शोकसभा
एच.डी. बाबा पाटील यांच्या निधनाबद्दल रविवारी सायंकाळी ४ वाजता रुईकर कॉलनीतील हिंद को-आॅप. सोसायटीच्या सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले आहे.