कोल्हापूर : एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपये हॅकर्सनी आॅनलाईनद्वारे परराज्यांतील ३४ लोकांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही खाती गोठविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांत संबंधित खातेदारांची चौकशी करण्यासाठी पथके रवाना केली जाणार आहेत.शाहूपुरी पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल अशा तिन्ही पातळीवर हा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारीदिली. बँकेचे सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी अतिजलद संगणक कार्यप्रणालीचा आॅनलाईन वापर करून दि. १९ एप्रिलला सकाळी ११ ते २ या तीन तासांत एचडीएफसी बँकेच्या खात्यातून इतर खात्यावर रक्कम वर्ग केली आहे. संबंधित ३४ खातेदारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. ही सर्व खाती पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा या राज्यातील आहेत.गरीबांना दाखविले आमिष?पैसे ट्रान्सफर करणाऱ्या हॅकर्सनी गरीब लोकांना काही रकमेचे आमिष दाखवून त्यांच्या खात्यावर पैसे घेतले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. रक्कम वर्ग झालेली सर्व खाती गोठविण्यासाठी पोलिसांनी संबंधित बँकांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. खातेदारांची नावे, ही खाती कधी सुरू झाली, त्यावरील व्यवहारांची माहिती पोलीस घेत आहेत.बँकांची कार्यप्रणाली लक्षात घेऊन आॅनलाइन सुरक्षा यंत्रणेतील उणिवा शोधून असे गुन्हे केले जातात. अशा पद्धतीने यापूर्वी घडलेल्या गुन्ह्याची माहिती घेतली जात आहे. पैसे वर्ग झालेल्या सर्व खात्यांची कसून चौकशी सुरू आहे. एचडीएफसी बँकेतील अधिकारी व कॅशिअरचेही जबाब नोंदविले जातील.
हॅकर्सनी कोल्हापूरातून लांबविले ६७ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 4:45 AM