हुपरी : स्वातंत्र्यानंतर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जी धोरणे तत्कालीन काँग्रेस राज्यकर्त्यांनी राबविली ती अत्यंत चुकीची होती. त्याचा दुष्परिणाम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही संपूर्ण जनतेला भोगावा लागत आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गेल्या १० वर्षांत कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ हुपरी (ता. हातकणंगले) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. माजी आमदार सुरेश हाळवणकर अध्यक्षस्थानी होते.गडकरी म्हणाले, देशाच्या विकासासाठी काँग्रेसने ६० वर्षांत राबविलेली ध्येयधोरणे व आम्ही गेल्या १० वर्षांत राबविलेल्या ध्येयधोरणांची तुलना देशवासीयांनी करून देशाचे भविष्य कुणाच्या हातात सुरक्षित राहील, याचा विचार करण्याची गरज आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे थैमान रोखण्यासाठी अनावश्यक पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी वॉटर ग्रीड धोरण अंमलात आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तसेच जलसंवर्धन ही काळाची गरज असल्याने पाळणाऱ्या पाण्याला चालायला लावणे,चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावणे व थांबणाऱ्या पाण्याला जिरविणे असा उपक्रम राबवून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला देशाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामार्गाची उभारणी करण्यासाठी ६२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार प्रकाश आवाडे, देशाचे भविष्य कुणाच्या हातात सुरक्षित आहे याची जाणीव प्रत्येक देशवासीयाला होण्याची गरज आहे.आमदार विनय कोरे म्हणाले, आपल्या देशाची सर्व क्षेत्रात होत असलेली प्रगती पाहवत नसणाऱ्या शत्रू राष्ट्रांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशाच्या प्रगतीत खोडा घालण्याचा उद्योग चालविला आहे.खासदार अनिल बोंडे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अशोक माने, जयदीप कवाडे, रुषभ जैन, सुभाष कागले, शिवाजी जाधव, अजित सुतार, मंगलराव माळगे, अमित गाट यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महावीर गाट, राहुल आवाडे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, मुरलीधर जाधव, पुंडलिक जाधव, हिंदुराव शेळके, रजनीताई मगदूम, राजवर्धन नाईक निंबाळकर, अरुण इंगवले, अजितसिंह मोहिते, सुरज बेडगे, दिनकर ससे, दौलतराव पाटील, गजानन जाधव आदी उपस्थित होते.